Karuna Munde : सध्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. या प्रकरणात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान करुणा शर्मा अर्थात करुणा धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३१ डिसेंबरला वाल्मिक कराड शरण

३१ डिसेंबरला पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड शरण आला. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड आहे. तसंच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा माणूस आहे असं सांगितलं जातं. यावरुनही सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले होते. सुरेश धस यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही. मात्र आकाचे आका असा उल्लेख त्यांनी अनेकदा केला आहे. दरम्यान त्यांनी करुणा मुंडेंच्या कारमध्ये पोलिसांनीच पिस्तुल ठेवलं होतं असाही दावा केला ज्यानंतर करुणा धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांचे आभार मानले आहेत. तसंच लवकरच भेट घेऊन पुरावे देणार असल्याचंही म्हटलं आहे. करुणा धनंजय मुंडेंनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात त्या सुरेश धस यांचे आभार मानत आहेत.

सुरेश धस यांचे करुणा मुंडेंनी मानले आभार

आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारे पोलिसच होते, असा दावा केला होता. यावर करुणा मुंडे यांनी त्यांचे आभार मानत गुंडगिरीचा पर्दाफाश करण्याची मागणी त्यांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली. सुरेश धसभाऊ माझ्याकडे खूप पुरावे आहेत, मला तुम्ही वेळ द्या…मी सर्व पुरावे घेऊन तुमच्याकडे येते, असं करुणा धनंजय मुंडे म्हणाल्या. पिस्तूल ठेवण्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मारहाणीपर्यंतचे पुरावे असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

करुणा मुंडे यांच्यावर ज्या केसेस केल्या त्या सर्व खोट्या होत्या. या केसेस पोलिसांना मॅनेज करुन या केसेस टाकण्यात आल्या. पहिल्यादा मी करुणा मुंडे यांच नाव घेतलं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?

करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी तीन वर्षांपूर्वी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. तसंच त्यांचे कधीपासून सहमतीने संबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्यं असल्याचं पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karuna munde said thank you to suresh dhas also said this thing in instagram video scj