शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं. पुढील चार दिवसात मी राजकीय गौप्यस्फोट करणार करेन, असा इशारा करुणा मुंडेंनी दिला. त्या छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणातील घराणेशाहीवरही टीका केली.
करुणा मुंडे म्हणाल्या, “मी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत आहे. कारण महाराष्ट्रात सध्या सगळीकडे बाजार समितीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत खूप घाणेरडापणा सुरू आहे. खालच्या पातळीवर जाऊन काम करत आहेत. त्याचा मी लवकरच भांडाफोड करणार आहे. मी जो गौप्यस्फोट करणार आहे तो राजकारणाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण सगळे लोक बघू शकतात.”
“तो व्हिडीओ आला की मी भांडाफोड करणार”
“दोन दिवसांनी माझ्याकडे एक व्हिडीओ येणार आहे. तो व्हिडीओ आला की मी भांडाफोड करणार आहे. सध्या माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आणि कागदपत्रे आहेत. व्हिडीओ आला की मी हा भांडाफोड करणार आहे,” असा इशारा करुणा मुंडे यांनी दिला.
व्हिडीओ पाहा :
“मी माझ्या मुलाला आज, उद्या, कधीही राजकारणात आणणार नाही”
करुणा मुंडे घराणेशाहीवर बोलताना म्हणाल्या, “महाराष्ट्रातील राजकारणात घाणेरडेपणा सुरू आहे. तो घाणेरडेपणा घराणेशाहीचा आणि हुकुमशाहीचा आहे. लोकशाही संपवली जात आहे. त्यामुळे मी करुणा धनंजय मुंडेने पक्ष काढला आहे. तसेच मी घराणेशाही संपवण्याची सुरुवात माझ्यापासून केली आहे. माझा मुंडे खानदानाचा एकच मुलगा आहे. त्याचं नाव सुशील धनंजय मुंडे असं आहे. मी त्याला आज, उद्या, कधीही राजकारणात आणणार नाही.”
“धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको”
“धनंजय मुंडे माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे. आता घराणेशाही संपली. कारण धनंजय मुंडेंनी माझा तिरस्कार केला आहे. धनंजय मुंडेंनी २७ वर्षानंतर मला रस्त्यावर सोडलं, तेव्हापासूनच माझी लढाई सुरू झाली आहे. ज्या दिवशी त्यांनी मला सोडलं, तेव्हापासून घराणेशाही संपली. आता मी घराणेशाहीत नाही. मी आता नवऱ्याबरोबर नाही. त्यामुळे ही घराणेशाही होणार नाही,” असं मत करुणा मुंडेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “मतदारसंघात साधा…”, धनंजय मुंडेंचं पंकजा आणि प्रीतम मुंडेंवर टीकास्र; म्हणाले, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत…”
“मी आज स्वतःच्या मुलाला घरात ठेऊन गोरगरीब जनतेला, गावोगावी, दारोदारी जाऊन भेटत आहे. मी त्यांना एकच विनंती करत आहे की, नव्या लोकांनी पुढे यावं,” असंही त्यांनी नमूद केलं.