काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करून चर्चेत राहिलेल्या करुणा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आज अहमदनगरमध्ये सभा घेतली. यावेळी शिवशक्ती सेनाअसं त्यांच्या पक्षाचं नाव असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय.
“एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. मात्र अनेक क्षेत्रात पाहतेय की अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसून येतोय. या काळात अनेकांनी सांगितले की स्वतःचा राजकीय पक्ष काढा, अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापित करण्याचा निर्णय घेतला असून या पक्षाचे नाव शिवशक्ती सेना असेल”, अशी घोषणा करूणा मुंडे यांनी अहमदनगर मध्ये एका पत्रकार परिषदेत केली.
“आज समाजकारण करताना मला सत्तेमध्ये असणे गरजेचे वाटले, त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा करत असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली. लवकरच मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा आणि निवडणूक लढवण्या संदर्भातील इतर माहिती जाहीर करणार, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे.
“माझ्याप्रमाणेच राज्यात अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यापैकी अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत,” असा दावाही करुणा शर्मा यांनी केला. दरम्यान पक्षस्थापनेनंतर आपण निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसेच बीडमधील परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवण्याचा मानस करुणा शर्मा यांनी व्यक्त केल्याचं बोललं जातंय.
कोण आहेत करुणा मुंडे?
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण बरंच तापलेलं पाहायला मिळालं. हे प्रकरण गाजत असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली. “करुणा शर्मा यांच्यासोबत माझे २००३ सालापासून परस्पर सहमतीने संबंध आहेत,” अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी दिली होती.