देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा नुकताच निकाल लागला असताना आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. आयोगाना जाहीर केलेल्या तारखेनुसार आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निमित्ताने आता कोल्हापुरात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण करुणा शर्मा यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे.
…तर सर्वात आधी धनंजय मुंडे जेलमध्ये असते; करुणा शर्मा यांचं मोठं विधान
धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असतील.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी मतदान
एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझा लढण्याचा कोणताही विचार नव्हता. एक महिन्यांपूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन आली तेव्हा अनेक लोक, उमेदवार भेटले. निवडणुकीला मी उभं राहावं अशी सर्वांची इच्छा आहे. आज इतके पक्ष आहेत आणि १३ कोटी जनता आहे पण परमबीर सिंग सारख्या व्यक्तीला देश सोडून जावं लागलं. आज इतका भ्रष्टाचार सुरु असून कोणीही आवाज उठवत नाही. मी आवाज उठवला असून निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे”.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “जर आपण आत्ता सत्तेत आलो तर काय वाईट असं माझी टीम सांगत आहे. २०२४ मध्ये तर नवरा विरुद्ध बायको लढत होणार असल्याचं नक्की आहे. संपूर्ण जगात याची चर्चा होणार आहे. धनजंय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे अशी लढत होणार आहे”.
निवडणूक आगोयाने जाहीर केल्यानुसार येत्या २४ मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २८ मार्च असेल. तर १२ एप्रिल प्रत्यक्ष रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून १६ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाईल.
भाजपाकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी
दरम्यान, चंद्रकांत जाधव यांच्या श्रद्धांजली सभेत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा विचार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी बोलून दाखवली होता. तथापि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष ही निवडणूक लढवणार आहे, असे जाहीर केले आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांचीही नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून देऊन चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
गत निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत महा विकास आघाडीचे नेते कोणती भूमिका घेतात यावर निवडणूक प्रामुख्याने दुरंगी होणार की तिरंगी याचा निर्णय होणार आहे.