काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करून चर्चेत राहिलेल्या करुणा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आज अहमदनगरमध्ये त्यांनी सभा घेतली. यावेळी शिवशक्ती सेना असं पक्षाचं नाव असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी अचानक चर्चेत आलेल्या करुणा मुंडे कोण आहेत, हे जाणून घेऊया.
कोण आहेत करुणा मुंडे?
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्या महिलेचं नाव होतं करुणा शर्मा. करुणा यांनी थेट राज्यातील कॅबिनेट मंत्र्यावर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण बरंच तापलेलं पाहायला मिळालं. करुणा शर्मा यांच्याबद्दल उपलब्ध माहितीनुसार, त्या मूळच्या मध्यप्रदेशमधील इंदूरच्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने मुंबईत राहतात. त्या मुंबईतील ‘जीवनज्योत’ या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत, असं त्यांनी फेसबुकवर म्हटलंय.
हेही वाचा – करुणा मुंडेंनी केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा; धनंजय मुंडेंविरोधात परळीतून निवडणूक लढवणार?
धनंजय मुंडेंची कबुली..
हे प्रकरण गाजत असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली. “करुणा शर्मा यांच्यासोबत माझे २००३ सालापासून परस्पर सहमतीने संबंध आहेत,” अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी दिली होती.
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
“करूणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली. दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.”
परळीत झालेली अटक..
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, करुणा शर्मांकडून मंत्री मुंडे यांच्या कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या. त्यानंतर जवळजवळ दोन आठवडे न्यायालयीन कोठडीत घालवल्यानंतर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची कोर्टाकडून सुटका करण्यात आली होती.
अहमदनगरमध्ये पक्षस्थापनेची घोषणा..
“एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. मात्र अनेक क्षेत्रात पाहतेय की अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसून येतोय. या काळात अनेकांनी सांगितले की स्वतःचा राजकीय पक्ष काढा, अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या पक्षाचे नाव शिवशक्ती सेना असेल”, अशी घोषणा करूणा मुंडे यांनी अहमदनगर मध्ये एका पत्रकार परिषदेत केली.