करुणा शर्मा यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी कोल्हापुरात बोलताना करुणा शर्मा यांनी आपला शिवशक्ती पक्ष आता कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार असल्याचं जाहीर केलं. तसंच लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अपेक्षित उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं करुणा शर्मांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
“जिथे जिथे पोटनिवडणूक असेल तिथे आमच्या पक्षाचा उमेदवार उभा करु. कोल्हापूरमध्ये दोन-तीन लोकांशी आमचं बोलणं सुरु असून यामध्ये उत्तम कागले, अजय देढे या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच इतर दोन जण राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या नावाची घोषणा नंतर करण्यात येईल,” अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली.
दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी शक्ती कायद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. शक्ती कायदा अंमलात आणला असता तर धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोघेही तुरुंगात असते असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.
“शक्ती कायदा हा केवळ दिखावा आहे. जर शक्ती कायद्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र सरकारने जर काही केलं असतं तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकलं असतं. त्यानंतर संजय राठोड यांना तुरुंगात टाकलं असतं. पण या लोकांवर साधा एफआयआर देखील पोलिसांनी दाखल केलेला नाही,” अशी टीका त्यांनी केली.