Karuna Sharma Allegations on Dhananjay Munde : करूणा शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे याची कागदपत्रं मी देईन असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या आधी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात धनंजय मुंडे किती खरं बोललात, हरिश्चंद्राचा अवतार आहेत का हे यावरूनच समोर येतं असा टोला करूणा शर्मा यांनी लगावला. त्याच प्रमाणे हे प्रतिज्ञापत्र म्हणजे धनंजय मुंडे किती खोटारडे आहेत याचा एकप्रकारे पुरावाच आहे असंही करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे खोटारडे आहेत
धनंजय मुंडे यांचं प्रतिज्ञापत्र दाखवत करूणा शर्मा म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी या प्रतिज्ञापत्रात पत्नींची संख्या लपवली आहे. कायदेशीररित्या धनंजय मुंडे दोन बायकांचे पती आहेत. ती माहिती लपवली आहे. तसंच मुलांची संख्या लपवली आहे. त्यांच्या विरोधात ज्या केसेस आहेत त्याची संख्याही धनंजय मुंडे यांनी लपवली आहे असंही करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे. तसंच मुलांची संख्याही लपवली आहे. एवढी सगळी लपवाछपवी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांना ते निवडून कसे देतात? हेच मला समजत नाही असंही करूणा शर्मा म्हणाल्या.
मी आत्तापर्यंत गप्प होते पण आता गप्प राहणार नाही
मी आत्तापर्यंत गप्प होते पण आता गप्प राहणार नाही. माझ्याविरोधात त्यांनी कोर्टाचा आदेश आणला होता की मी माध्यमांना काहीही माहिती देऊ शकत नाही. पण आता मी शांत राहणार नाही. आज धनंजय मुंडे यांची याचिका दाखवते आहे. त्यात १९९८ पासून मी आणि करूणा सोबत आहोत असं लिहिलं आहे मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही १९९६ पासून सोबत राहतो आहोत. तसंच जे प्रतिज्ञापत्र धनंजय मुंडे यांनी सादर केलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की मी आणि करूणा जगातल्या काही देशांमध्ये गेलो आहे. धनंजय मुंडे आजपर्यंत जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले आहेत तेव्हा मीच त्यांच्यासोबत होते. कारण त्यांचं माझ्यावर तेवढं प्रेम त्यांचं होतं. मला धनंजय मुंडेंपासून दोन मुलं आहेत. माझ्या मुलांच्या आधार कार्डवर, पॅन कार्डवर वडील म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव आहे. माझ्या आधार कार्डवर, पासपोर्टवरही धनंजय मुंडेंचं नाव आहे. या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी हे देखील लिहून दिलं आहे की मुलं माझी आहेत. हे सगळे पुरावे आज करूणा शर्मा यांनी सादर केले.
मी कोट्यवधींची मालकीण
माझ्या नावावर एक कोटींची पॉलिसी आहे. यामध्ये नॉमिनी म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांचं नाव आहे. मी ही पॉलिसी २०१६ मध्ये काढली आहे. याशिवाय माझा पासपोर्ट, माझं आधार कार्ड या सगळ्यावर करूणा धनंजय मुंडे आहे. माझ्या मुलांच्या जन्म दाखल्यांवरही धनंजय मुंडे यांचं नाव आहे. आज माझा मुलगा १९ वर्षांचा आहे. इतके दिवस कधीही धनंजय मुंडे यांना यामुळे कुठलीही समस्या आली नाही. पण त्यांनी जेव्हा नीचपणाचा कळस गाठला तेव्हा मी पण गप्प बसणार नाही हे मी ठरवलं असं सांगत करूणा शर्मा यांनी सगळी कागदपत्रं पत्रकार परिषदेत सादर केली.