मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला आज सकाळी (बुधवार) फासावर लटकविण्यापूर्वी त्याच्या अंतिम इच्छेबाबत विचारले असता, ‘माझी कोणतीही शेवटची इच्छा नाही’, असे त्याने सांगितल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली आहे. कसाबचा मृतदेह मुस्लिम रितीरिवाजानुसार येरवडा कारागृहाच्या परिसरातच दफन करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
२६/११ पूर्वीच फाशी दिली ते योग्यच झाले – विनिता कामठे
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला चार वर्षे पूर्ण होणार असून त्याआधी चारच दिवस या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला २६/११ पूर्वीच फाशी दिली ते योग्यच झाले, अशी प्रतिक्रिया हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी अशोक कामठे यांच्या पत्नी विनिता कामठे यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक कामठे यांचे वडील मारूती कामठे यांनी देखिल कसाबला झालेल्या फाशीबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले आहे.