निवडणूक आयोगानं कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. संबंधित दोन्ही मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. या जागांवरून आता महाविकास आघाडीमध्ये धूसपूस सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष असून जागा दोनच आहेत. त्यामुळे संबंधित जागा कोणत्या पक्षांना मिळणार यावरून पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल, असं विधान केलं आहे. तसेच कसब्यातील जागेसाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे, असंही नाना पटोले म्हणाले. त्यामुळे ही जागा कोण लढवणार? यावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित जागेबाबत तिन्ही पक्ष चर्चा करतील, त्यानंतर ती जागा कोणत्या पक्षाला द्यायची, हे ठरवलं जाईल, असं विधान जाधव यांनी केलं. ते रत्नागिरी येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, “नाना पटोले हे एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचं विधान गांभीर्याने कसं घेता येणार नाही. पण जो निर्णय होईल, तो तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी म्हणून घेतील. कोणती जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेनं लढवायची? हे महाविकास आघाडी म्हणून ठरवलं जाईल. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने दावा जरी केला असला तरी निर्णय एकत्रितपणे होईल, कारण जागा दोनच आहेत.”