संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपाला धुव्वा उडाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाने भाजपाच्या पारंपारिक बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रवींद्र धंगेकर मनसेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. पण, २०१९ साली धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता कसबा पेठ निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर रवींद्र धंगेकर राज ठाकरे यांची भेट घेणार का? याबद्दल त्यांनी खुलासा केला. ते ‘झी २४ तास’च्या तास’च्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा : भविष्यात काँग्रेसचा ‘हात’ सोडणार का? रवींद्र धंगेकरांनी स्पष्टच दिलं उत्तर; म्हणाले…
“शिवसेनेत असताना दीपक पायगुडे यांच्यामुळे राज ठाकरेंकडे आकर्षित झालो. १० वर्षे मनसेत नगरसेवक म्हणून काम केलं. पण, २०१९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही राज ठाकरेंशी संवाद ठेवला. राज ठाकरेंबद्दल आदर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांच्या हाताखाली काम केलं आहे,” असं धंगेकरांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : “…तर मी मानहानीचा दावा ठोकणार”, उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा
“ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे. आजही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. शिवसेना आणि मनसे सोडली, पण त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. कारण, कुटुंब म्हणून त्या परिवारात राहत होतो,” असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.
आमदार झाल्यावर राज ठाकरेंचा फोन आला होता का? असं विचारल्यावर धंगेकर म्हणाले, “राज ठाकरेंचा फोन आला नाही. पण, त्यांना भेटण्यास जाणार आहे,” असं धंगेकरांनी सांगितलं आहे.