कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या कसब्यातील निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होती. तर, चिंचवडच्या निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती. पण, कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला. तर, चिंचवडची जागा वाचवण्यात भाजपाला यश आलं आहे.
कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला. रवींद्र धंगेकरांच्या विजयाने तब्बल २८ वर्षानंतर भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र, भविष्यात काँग्रेसची साथ सोडणार का? यावर विचारलं असता रवींद्र धंगेकरांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा : “माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो…”, आमदार सत्यजीत तांबेंचं भरसभेत वक्तव्य
‘झी २४ तास’च्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ या कार्यक्रमात बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “नाही, काँग्रेस सोडणार नाही. काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारांचा पक्ष आहे. लहान वयात शिवसेनेत गेलो. शिवसेना आणि मनसेत असताना मानसन्मान मिळाला. काँग्रेसमध्येही मानसन्मान मिळाला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे आभार मानलेच पाहिजे.”
हेही वाचा : मटण खाऊन देवदर्शन केल्याचा विजय शिवतारेंचा आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यासंदर्भात मी…”
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अन्…”
“संग्राम थोपटेंनी दत्तक म्हणून कसबा पेठ मतदारसंघ घेतला होता. त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी पालकमंत्री असताना वसंततात्या थोरात यांना निवडून आणण्यात महत्वाची जबाबदारी बजावली होती. आज संग्राम थोपटेंनी ती कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खूप प्रेम केलं. कार्यकर्त्यांवर कसं प्रेम केलं जातं, हे अजितदादांकडून शिकलं पाहिजे,” अशी प्रांजळ भावना रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.