Shameema Akhtar Marathi Song: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच अधिवेशन राजधानी दिल्लीत होत आहे. ‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या २१ फेब्रुवारीपासून २३ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर हे संमेलन होणार असून या संमेलनासाठी साहित्य क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळातूनही मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे संमेलनाच्या राजकीय चेहऱ्यावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चेतल्या गोष्टींबरोबरच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने काश्मिरी गायिका शमीमा अख्तर यादेखील चर्चेत आल्या आहेत. त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे त्यांनी गायलेलं गाणं!
काश्मीरमधील बांदीपोरा भागातील रहिवासी असणाऱ्या प्रसिद्ध गायिका शमीमा अख्तर यांनी गायलेल्या एका मराठी गाण्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शमीमा अख्तर यांनी ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे गाणं गायलं आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या इन्स्टाग्राम पेजवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात शमीमा अख्तर त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत मराठी गाणं गाताना दिसत आहेत.
शमीमा अख्तर यांचं बहुभाषिक गायन!
गायिका शमीमा अख्तर या त्यांच्या बहुभाषिक गायनासाठी ओळखल्या जातात. मराठीबरोबरच शमीमा अख्तर बंगाली, कानडी, डोगरी, पंजाबी, संस्कृत आणि त्यांची मायबोली काश्मिरी भाषेत गाणी गातात. गाण्याच्या माध्यमातून समाजात प्रेम व शांततेचा संदेश देणं, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शमीमा अख्तर वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गात असतात. त्यांच्या या गाण्यांना श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. शमीमा अख्तर यांनी गायलेली भक्तिगीतंही श्रोत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.
काही दिवसांपूर्वी शमीमा अख्तर यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा अभंग स्वरबद्ध करून गायला होता. त्याचबरोबर गेल्या महिन्यात त्यांनी महावितरणच्या एका कार्यक्रमात ‘माझे माहेर पंढरीचे’ हे गाणं गायलं होतं. या गाण्याचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
साहित्य संमेलनाकडे मराठीजनांचा ओढा
तब्बल ७१ वर्षांनंतर यंदा प्रथमच दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचं ठिकाण अर्थात तालकटोरा स्टेडियमचंही मराठीशी ऐतिहासिक नातं आहे. १७३१ साली थोरले बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं मुघलांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाचं साहित्य संमेलन हे ऐतिहासिकदृष्ट्यादेखील महत्त्वाचं ठरलं आहे.