पश्चिम घाटाची आज हवाई पाहणी
पश्चिम घाटाची उद्या (मंगळवार) हवाई पाहणी करण्यात येणार आहे. माधव गाडगीळ पश्चिम घाट अभ्यास समितीचा पुनर्विचार करणारी कस्तुरीनंदन समिती ही पाहणी करणार असून, विशेषत: सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सह्य़ाद्री पट्टय़ात ही हवाई पाहणी असेल .
केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या माधव गाडगीळ पश्चिम घाट अभ्यास समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून सर्वच राजकीय नेत्यांनी या अहवालावर तोंडसुख घेतले होते.
केंद्राने गाडगीळ समितीने सादर केलेल्या अहवालाची छाननी करून शिफारसी करण्यासाठी कस्तुरीनंदन चार सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने मध्यंतरी राज्याला भेट दिली असता मुख्यमंत्र्यांसह सर्वानीच माधव गाडगीळ समितीच्या अहवालास विरोध केला . सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात विपुल औषधी वनस्पती, घनदाट जंगल, नैसर्गिक झरे, जैवविविधता, पशु-पक्षी मोठय़ा प्रमाणात असल्याचे गाडगीळ समिती अहवालात म्हटले होते. त्यामुळे वृक्षतोड व मायिनग प्रकल्पांना बंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर चार सदस्यीय समिती पश्चिम घाटाची हवाई पाहणी करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बंदी आदेशातून आणि इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळावा अशा मागण्या होत असल्याने या समितीच्या पाहणीस महत्त्व प्राप्त झाले आहे. कस्तुरीनंदन समितीचा दौरा निश्चित झाला असला तरी त्याबाबत गुप्तता राखण्यात आल्याचे दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा