जर तुम्ही ‘कौन बनेगा करोडपति’च्या नव्या सीजनची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडच्या बिग बींचा गेम शो ‘केबीसी’चा नवा सीजन भेटीला येतोय. या शोसाठी रजिस्ट्रेशनची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे.

सोनी चॅनलने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “पुन्हा एकदा ‘केबीसी’चे प्रश्न घेऊन भेटीला येत आहेत मिस्टर अमिताभ बच्चन…तर उचला फोन आणि व्हा तयार…कारण १० मे पासून सुरू होत आहेत केबीसी १३ साठीचे रजिस्ट्रेशन !”

‘केबीसी १३’ च्या मेकर्सनी नव्या सीजनचा प्रोमो देखील रिलीज केलाय. या प्रोमोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन स्टेजवर एन्ट्री करताना दिसून येत आहेत. ‘केबीसी १३’ साठी १० मे पासून विचारले जाणारे प्रश्न किती वाजता टेलिकास्ट होणार आहेत आणि कशा पद्धतीने उत्तरे पोहचवावी लागतील, याबाबतची माहिती देखील लवकरच देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी केले होते अनेक बदल
गेल्या वर्षी करोनाच्या परिस्थितीमुळे या शोमध्ये काही बदल करण्यात आले होते. ऑडियंस पोल लाईफलानचं ‘व्हिडिओ- अ फ्रेंड लाईफलाइन’ मध्ये रूपांतरीत करण्यात आलं होतं. तसंच स्पर्धकांचं ऑनलाईन ऑडिशन घेण्यात आलं होतं.

कुठे होणार ‘केबीसी १३’चं शूटिंग ?
गेल्या वर्षी करोना परिस्थितीमुळे ‘कौन बनेगा करोडपति’चा १२ वा सीजन २८ सप्टेंबरला प्रदर्शित करण्यात आला होता. करोनामुळे ‘केबीसी१२’ च्या सेटवर अभिनेता अमिताभ बच्चन यांनी पीपीई कीट घालून आणि सर्व कोव्हिड नियमांचं पालन करून शूटिंग करण्यात आली होती. यंदाच्या १३ व्या सीजनमध्येही अशाच प्रकारे शुटिंग करण्यावर विचार सुरूये. ‘केबीसी’ च्या १३ व्या सीजनमध्ये बायो बबल लावून शूटिंग केली जाणार असल्याचं देखील बोललं जातंय. परंतू या शोची शूटिंग कुठे आणि कोणत्या लोकेशनला होणार, याबाबत अद्याप तरी कोणती माहिती दिलेली नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचाही सीजन सप्टेंबर महिन्यातच प्रदर्शित केला जाणार असल्याचं देखील बोललं जातंय.