कविता महाजन यांची ‘कुहू’ ही कादंबरी प्रचंड गाजली.  या कादंबरीच्या निर्मितीमागचा प्रवास त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्यात आला होता. डिसेंबर २०१० मध्ये लोकप्रभाच्या अंकात ‘कुहू’ संदर्भात कविता महाजन यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. शर्मिला फडके यांनी ही मुलाखत घेतली होती. आज पुन्हा एकदा ही मुलाखत प्रसिद्ध करत आहोत.

‘कुहू’ कादंबरीमध्ये शब्दांव्यतिरिक्त इतकी सगळी माध्यमे नक्की का वापराविशी वाटली? तुझ्यामधला चित्रकार कादंबरीलेखनामध्ये तैलचित्रांचा वापर करू इच्छितो हे समजण्यासारखं आहेही, पण अ‍ॅनिमेशन, संगीत, व्हिडीओज, कॅलिग्राफी.? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड का? ‘कुहू’चं मल्टिमीडिया स्वरूप नक्की कधी निश्चित झालं? कथानकातल्या माध्यमांची जागा कशी ठरवली?

om puri and shabana azmi
“लोक जेवायला बोलवायचे तेव्हा आम्ही…”, शबाना आझमींनी सांगितला ओम पुरी यांच्याबरोबरचा किस्सा; म्हणाल्या…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
serial killer drama
नाट्यरंग: सीरियल किलर; मालिकावेडाची भयावह, विनोदी परिणती
Abhijeet Sawant
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ गाण्यावर अभिजीत सावंतने काढले भन्नाट सेल्फी! नेटकरी म्हणाले, “बाईSSS…”
prathamesh parab dance on dada kondke song
काय गं सखू, बोला दाजिबा! दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर प्रथमेश परबचा मॉडर्न अंदाज; सोबतीला आहे पत्नी, पाहा व्हिडीओ
krushna abhishek govinda feud ended
अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”
Annu Kapoor recalls on kiss controversy
Annu Kapoor: “मी हिरो असतो तर…”, प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार, संतापलेले अन्नू कपूर काय म्हणाले?
Marathi Actor Ajinkya Deo presented a poem in memory of his father Ramesh Deo watch Video
Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ

हे मुद्दाम नाही झालं. ‘कुहू’चं कथानक जन्माला आलं तेच या साऱ्या माध्यमांना आपल्यात सामावून घेत. कुहू हा गाणारा पक्षी, जंगलात राहाणारा. आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर बनवायचं आहे. एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून पर्यावरणाचा अभ्यास करायला काही मुलं आणि मुली येतात. त्यातल्या एका मुलीला कुहूचं गाणं खूप आवडतं आणि तिला कुहू आवडायला लागतो. कुहूसुद्धा तिच्या प्रेमात पडतो आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावंसं वाटतं ते सारं तो करायला जातो. माणसाची भाषा त्याला माणसाची भाषा त्याला शिकायची आहे, माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय. मानुषीच्या प्रेमात पडलेल्या कुहूमुळे पक्ष्यांची आणि माणसांची भिन्न जग डहुळून जातात.
कुहूची व्यक्तिरेखा, तो राहात असतो ते जंगल, जंगलातले इतर प्राणी, पक्षी यांचं जग, त्यातले बारीकसारीक तपशील जे माझ्या मनात ठळकपणे उमटले होते ते त्यातल्या रंग, आकार, आवाजांच्या संवेदनांसहित होते आणि ते नेमकेपणी व्यक्त करायला शब्दांचं माध्यम पुरेसं नाही असं माझ्या लक्षात येत गेलं. मग शब्दांना रंग, सूर वगैरे माध्यमांची जोड देऊन त्यांच्या संवेदनांची जाणीव तीव्र करता येऊ शकेल का, याचं विचारचक्र माझ्या मनात सुरू झालं. पण या बाबतीत नेमकं काय करता येऊ शकेल ते कळत नव्हतं. त्यावेळी एकदा अचानक माझा जुना मित्र समीर सहस्रबुद्धे भेटला. तो अ‍ॅनिमेशन फिल्डमधला. त्याची काही अ‍ॅनिमेशन्स बघताना जाणवलं की ‘कुहू’ची कथा आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊन डीव्हीडीमध्ये बसवू शकतो. मग त्याचं मल्टिमीडिया स्वरूप पुढे समीरशी होणाऱ्या चर्चेमधून हळूहळू स्पष्ट होत गेलं.
आता मला काय नक्की हवंय ते स्वत:शी मोकळेपणी ठरवता यायला लागलं. माध्यमांशी तडजोड थांबवली. जे मनात आहे ते कधी रंगांतून, कधी शब्दांतून असं व्यक्त होतं राहिलं. लिहिलेलं आपल्या जाणिवांशी जुळतंय की नाही ते पुन: पुन्हा तपासून पाहात राहिले. तब्बल १९ वेळा मी ‘कुहू’चा ड्राफ्ट लिहून काढला.
कुहूचा माणसांच्या जगाकडे आणि पुन्हा परत असा सगळा प्रवासच मुळात गाण्यांच्या सोबतीने होतो. त्याच्या मनात उमटणाऱ्या भावनांना जे स्वर होते त्यांची गाणी झाली. काही स्वर, शब्द त्याचे स्वत:चे आकार, रंग घेऊनच जन्मतात. त्यांना कॅलिग्राफीशिवाय पर्याय नव्हता. उदा. पक्ष्याचे पिल्लू जेव्हा कळवळून आई. म्हणून ओरडते तेव्हा त्याच्या त्या आवाजाला पडद्यावर कॅलिग्राफीमधून साकारावेसे वाटले. मग हळूहळू एकेक माध्यम ‘कुहू’मध्ये आपापली जागा घेऊ लागलं. ऑडिओ, व्हिडीओ, कॅलिग्राफी, पेंटिंग्ज, फोटोग्राफ्स, अ‍ॅनिमेशन इत्यादी. एकूण साडेतीन तासांची ही डीव्हीडी बनली. माध्यमांचं हे एकात एक गुंतणं आहे. अनेक माध्यमं एकत्रित येऊन त्यांचं वेगळं असं माध्यमच विकसित झालं आहे या प्रयोगात. प्रत्येक माध्यमाची आपापली एक वेगळी मजा आहे.

‘कुहू’ नेमकी कधी आणि कशी सुचली? ‘कुहू’च्या कथानकात जंगल आणि माणूस यांच्यामधलं नातं हा केंद्र विषय आहे. तुझी या आधीची पुस्तके म्हणजे ‘ब्र’, ‘भिन्न’ या कादंबऱ्या, ‘तत्पुरुष’ किंवा ‘धुळीचा आवाज’ हे कवितासंग्रह, नुकतंच आलेलं ‘ग्राफिटी वॉल’सारखं पुस्तक, या सर्वापेक्षा ‘कुहू’चं स्वरूप फारच वेगळं आहे. लेखनवृत्तीत झालेला हा बदल जाणीवपूर्वक आहे की नकळत?

‘भिन्न’ लिहून झाल्यावर प्रचंड ताण मनावर होता, कारण जशी ‘ब्र’ एका क्षणाला लिहून संपली तशी ‘भिन्न’ लिहून संपलीच नाही कधी. त्यात खूप अडकून राहिले होते मानसिकरित्या, कार्यकर्त्यांच्या भूमिकेतूनही. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून जन्माला आलेली मुले, त्यांना जन्म देऊन तरुण वयात मृत्युमुखी पडलेल्या मुली, त्यांच्या यातना हे सगळं जग, छळ, फसवणूक, नात्यांवरचा, माणसांवरचा विश्वास उडवणारं होतं. त्यानंतर टाटा समाजविज्ञान संस्थेसाठी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी एक अभ्यासदौरा केला. जवळ जवळ ७/८ महिने विदर्भातच होते. तेव्हाही पुन्हा मृत्यू, ताण, आत्महत्या झालेल्या त्या घरातल्या लहान वयाच्या मुलांच्या मनावर झालेला विपरित परिणाम. त्या काळात मी एका कुरूप वास्तवाच्या सातत्याने सहवासात होते. जगात काही तरी सुंदर आहे, चांगलं आहे याचा विश्वास पुन्हा मिळवणं मला गरजेचं झालं. पण आजूबाजूच्या जगातून तो मला मिळेना. निरागसता, साध्या साध्या गोष्टींमधून होणारा आनंद, निर्भेळ छोटी-छोटी सुखं कुठे तरी नाहीशीच होत चाललेली आहेत, दुर्मिळ झालेली आहेत असं त्या काळात अचानक लक्षात यायला लागलं. समाजाचा, त्यातल्या व्यक्तींचा एकंदर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच समूळ बदलत चालला आहे हे स्पष्ट दिसत होतं. नैसर्गिक वागणं माणसांना आजकाल अनैसर्गिक वाटायला लागलंय की काय अशी परिस्थिती आजूबाजूला असते हेच हवं होतं का आपल्याला? कुठे घेऊन जाणार आहे हे सारं? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मग प्रयत्न सुरू झाला. शोध सुरू झाला त्या निरागस आनंदाचा. एक व्यक्ती म्हणून आणि एक लेखक म्हणूनही हा शोध सुरू होता, पण काही केल्या मनात सकारात्मक असं काही बीज रुजेना. अस्वस्थता, ताण वाढतच होता.
आणि एक दिवस अचानक मला ही एका पक्ष्याची रूपक कथा सुचली. जंगलात राहणाऱ्या एका गाणाऱ्या पक्ष्याची गोष्ट. ती लिहून काढली. पण आज काल कोणीच रूपक कथा लिहीत नाही. तेव्हा ती कितपत फुलवावी, असा प्रश्न मनात आला आणि ती तशीच दोन र्वष पडून राहिली. सुधीर रसाळांशी एकदा सहज त्याबद्दल बोलणं झालं. सुचलेली कथा कोणत्या फॉर्ममध्ये सुचली आहे, तो योग्य आहे का अशा विचारांच्या फार आहारी जाऊ नकोस, सुचले आहे ते लिहून काढ, उत्स्फूर्तता महत्त्वाची, असा सल्ला त्यांनी दिला. तेव्हा मनावरचं दडपण, ताण कमी झाला. लिहिताना आपोआप मोकळेपणा येत गेला.

त्या काळातच तुझं पेंटिंगही एका मोठय़ा गॅपनंतर सुरू झालं होतं, ते कसं काय? ‘कुहू’साठी पेंटिंग्ज करायची हा उद्देश त्यामागे होता का? ‘कुहू’च्या कथानकाचं आणि चित्रांचं नक्की काय नातं आहे?

मधल्या काळात पेंटिंग करणं मी अजिबातच सोडून दिलं होतं. वैचारिक, भाविनक गोंधळाचाच तो काळ होता. ‘कुहू’चा विषय योग्य आहे की नाही, यावर पुढे लिहिता येईल की नाही ते कळत नव्हतं. लेखन बंदच झालं. विचित्र बेचैनी मनात सतत होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग मी ठरवून चित्रांकडे वळले. मधे १८ वर्षांची गॅप झाली होती. फारसा आत्मविश्वास नव्हता, पण ऑइलचं सामान आणलं आणि सगळं सोपं झालं. मधली र्वष जणू गेलीच नव्हती इतक्या सहजतेनं काम सुरू झालं. ‘कुहू’चा विषय डोक्यात होता. मग त्या विषयावरचं पेंटिंग्ज सुरू झाली. या आधी पेंटिंग करताना मी जे रंग कधीच वापरले नसते ते सगळे रंग, वेगवेगळी तंत्रं बेधडक वापरायला लागले. ऑइल पेंटिंग हे खरं तर खूप वेळ घेणारं माध्यम आहे, पण माझ्या डोक्यात चित्र इतकं सुस्पष्ट उमटत असे की, आश्चर्य वाटेल इतक्या कमी वेळात चित्र पूर्ण होत गेली. रफ स्केचिंग वगैरे भानगडीच नाही. डायरेक्ट कॅन्व्हासवर रंगांची मुक्त उधळण.
‘कुहू’साठी पेंटिंग्ज करतानाचा माझा अनुभव विलक्षण होता. रंगांच्या माध्यमांतून व्यक्त होणं म्हणजे नेमकं काय याचा अनुभव मला आला. त्या काळातल्या माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात मी बाजूला सारून ठेवलेल्या, दडपलेल्या, कोंडलेल्या साऱ्या भावनांचा निचरा कॅन्व्हासवर माझ्या हातून उमटणाऱ्या रंगाच्या प्रत्येक फटकाऱ्यातून होत गेला आणि तो मला जाणवत गेला. मी अधिकाधिक मुक्त होत गेले. हा सारा काळ जेव्हा मी चित्र रंगवण्यासाठी इझलसमोर उभी राहात होते तो माझ्यासाठी फार आनंदाचा होता. माझी तब्येत खरं तर बरी नसायची. कधी जेमतेम १५ मिनिटं मला उभं राहून रंगवता यायचं, पण हळूहळू हा वेळ वाढत गेला. अर्धा तास, दोन तास. माझ्या मनात बरीच र्वष एक खंत होती की माझं पेंटिंग सुटलं. ती खंत निवळत गेल्याचा आनंद इतका होता की त्यापुढे शारीरिक कष्ट, वेदना मला जाणवल्याही नाहीत. मनातल्या भावनांचा निचरा होत असल्याने सुरुवातीला पेंटिंग करून झाल्यावर मला आत्यंतिक थकवा यायचा. ‘कुहू’च्या भावभावनांसोबत नकळत माझ्याही भावना पेंटिंग्जमधून आविष्कृत होत गेल्या. आता जेव्हा तटस्थपणे ही पेंटिंग्ज मी पाहाते तेव्हा मला हे जाणवतंय. त्या वेळी अर्थातच कॅन्व्हासवर रंगलेपनाचा फक्त एक आवेग मनात होता. आपण एरवी जसे रडून मोकळे होतो तशी मी चित्रांवरच्या रंगांमधून मोकळी होत गेले.
‘कुहू’ कादंबरीतला कोकीळ मानुषीवर प्रेम करत असतो. सृष्टीकडे तो हट्टच धरतो की मला तू माणूस बनव. सृष्टी ऐकते. शेवटी त्याचं आणि मग कुहूचं म्हणजे त्या कोकीळ पक्ष्याचं रूपांतर माणसात व्हायला लागतं. त्या वेळी त्या बदलाची वेदना कुहूला अंतर्बाह्य जाणवते. या प्रसंगावर मी जेव्हा पेंटिंग करत होते तेव्हा कुहूचा तो आक्रोश माझ्या बोटांना जाणवत होता. कोकीळ पक्ष्याची पांढरट लाल रंगाची अर्धवट उघडी चोच, त्याच्या डोळ्यातली वेदना चित्रात जशीच्या तशी उमटली.
‘कुहू’तलं माझं सर्वात आवडतं पेंटिंग आहे प्रेमात पडल्यावर उन्मुक्तपणे नाचणाऱ्या बगळ्याचं. अत्यंत आनंदी, उत्फुल्ल मूड पकडता आला आहे मला या चित्रात असं वाटतं. प्रेमात पडल्यावर आजूबाजूची दुनियाही बदलून जाते. बगळा मान उंचावून चंद्राकडे बघत जेव्हा नृत्य करायला लागतो तेव्हा त्याला तो चंद्रही फक्त आपल्याकरिताच प्रकाश पाझरवत आहे असं वाटत असतं. चित्रातला चंद्रही त्यामुळे एखाद्या फ्लडलाईटसारखा तेजाळला आहे. बगळ्याच्या पायातळीचा पाचोळाही आनंदाने उडत आहे. आता सांगतानाही आश्चर्य वाटतंय की, हे प्रेमात पडलेल्या बगळ्याचं चित्र मी अक्षरश: पंचवीस मिनिटांमध्ये चितारलं.
‘कुहू’साठी पेंटिंग करण्याच्या या प्रोसेसमध्ये मनावरचा सारा ताण निवळला. लेखन आपसूक सुरू झालं. शब्दांसोबतच चित्रही मनात येत गेल्याने ‘कुहू’ लिहीत असताना शब्दांचा अतिरेकी वापर आपोआप टाळला गेला.

‘कुहू’साठी केलेली ही सर्व म्हणजे एकूण ४३ पेंटिंग्ज डीव्हीडीमध्ये असणार आहेत तशीच कादंबरीतही असणार आहेत का? या इतक्या ऑइल पेंटिंग्जना पुस्तकात सामावून कसे घेतले आहे?

‘कुहू’मधली पेंटिंग ही एक स्वतंत्र चित्रं म्हणूनच आहेत. ती काही कथानकाला अनुसरून केलेली इलस्ट्रेशन्स किंवा पूरक चित्रं नाहीत. सर्व पेंटिंग्ज पुस्तकात कथानकाचा भाग म्हणूनच येतील. कुहूच्या निमित्ताने ज्या बऱ्याच गोष्टी मराठीत (आणि इतर भारतीय भाषांमध्येही) पहिल्यांदाच होणार आहेत त्यापैकी एक म्हणजे ही पूर्ण कादंबरी आर्ट पेपरवर छापली जाणार आहे आणि ती पूर्ण रंगीत असेल. त्यात तैलचित्रांचा वापर केला जाणार आहे.
‘कुहू’च्या चारही पुस्तकांच्या एकूण (बाल आवृत्ती धरून) ६१६ रंगीत पानांची मांडणी मी स्वत: केली आहे. पहिल्यांदाच हे केलं आणि तेसुद्धा केवळ १५ दिवसांत. पुस्तकाचं मुखपृष्ठाचं चित्र चितारताना जितकी मेहनत घेतली जाते तितकी ‘कुहू’ पुस्तकाच्या प्रत्येक पानासाठी मी मेहनत घेतली आहे. ‘कुहू’चं प्रत्येक पान हे रंगीत आर्ट प्लेटच आहे. रंगांची, पोताची अद्भुत दुनिया ‘कुहू’च्या पानापानांतून उलगडत जाईल.

‘कुहू’मधलं जंगल कथानकात एक महत्त्वाची भूमिका बजावतं. यातले कुहूचे सोबती, वेगवेगळे प्राणी, पक्षी फार लोभस वाटतात, खरे वाटतात. जंगल आणि माणसामधले तुटत गेलेले नाते पुन्हा प्रस्थापित होण्याबद्दल भाष्य कुहूच्या कथानकात आहे. ते भाष्य नेमकं कसं येतं? पूर्वी इसापनीतीमधून जसा प्राणी-पक्ष्यांद्वारे शहाणपणाचे, नैतिकतेचे धडे अचूक पोचवले जायचे तसे यातले कुहूचे सोबती पर्यावरण संवर्धनाचे, निसर्गाकडे परतण्याचे काही धडे आधुनिक काळाला अनुसरून देतात का?

जंगलातील जीवसृष्टीच्या आधुनिक अभ्यासाचा धांडोळा घेताना सापडलेल्या वास्तव निरीक्षणांचा आधार इथे घेतलेला असून माणसांच्या स्वभावाचं आरोपण प्राण्या-पक्ष्यांवर करणं टाळलं आहे. उदा. कोल्हा लबाड असतो वगैरे. आज आपल्याला नॅशनल जिओग्राफिक्स वगैरेमधून प्राणी-पक्षी फार जवळून त्यांच्या नैसर्गिक स्वभाव- कौशल्यांसहित जवळून न्याहाळता येतात, अनेकांनी प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या सवयींवर, स्वभाववैशिष्टय़ांवर संशोधन केलं आहे. त्यामधून जे शास्त्रीय निष्कर्ष काढले आहेत त्यानुसारच मी ‘कुहू’मधले प्रत्येक प्राणी-पक्षी रंगवले आहेत. त्या दृष्टीने ‘कुहू’ ही रिअ‍ॅलिटी बेस्ड फॅन्टसी आहे. कल्पनेहून अधिक अद्भुत असतं वास्तव हे ‘कुहू’मधून दाखवण्याचा प्रयत्न आहे. सशाच्या डोळ्यांना पापण्या नसतात किंवा झाडउंदराचं शरीर जेवढं लांब असतं तेवढीच लांब त्याची शेपटी असते. इथे वसईतही माझ्या घराभोवती खूप पक्षी जमतात. कोकीळ, ठिपकेवाली मुनिया, बुलबुल, सूर्यपक्षी, फुलचुखे, राघू, चिमण्या तर थव्यांनी असतात. त्यांच्या हालचाली मी निरखल्या, कुतूहलानं पक्ष्यांवरची अनेक पुस्तकं मुद्दाम मिळवून त्या काळात वाचली. कोतवाल पक्ष्याचं नकला करण्याचं कौशल्य, खारीचा को-ऑपरेटिव्ह स्वभाव अशा अनेक मजा ‘कुहू’त आहेत, ज्यांना शास्त्रीय आधार आहेत. यातल्या काही माझ्या कामाच्या निमित्ताने सतत जंगलातून फिरताना मला दिसलेल्या आहेत तर काही मी मुद्दाम वाचन करून जाणून घेतल्या. आपण म्हणतो सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत. आता यामागेही वास्तव आहे. सरडा आपला परिसर सोडून उगीचच लांब कुठे भटकायला जात नाही. माझ्या घरासमोरच्या कढीपत्त्याच्या झाडावर एक सरडा रोज यायचा. त्याच फांदीवर, त्याच जागी बसायचा. एकदा त्याला मांजरीने पळवून लाावला. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथेच आला. मांजरीने दबा धरून हल्ला केला आणि त्याला मारून टाकला. ती विलक्षण झटापट मी पाहिली. ही अशी जीवननाटय़ं ‘कुहू’मध्ये उतरली. ही निरीक्षणं मी मुद्दाम केली नव्हती, पण त्यांचे संदर्भ ‘कुहू’मध्ये ठळकपणे उतरले.

‘कुहू’चं मल्टिमीडिया स्वरूप, पुस्तकाची आर्ट पेपरवर संपूर्ण रंगीत छपाई म्हणजे हे अत्यंत खर्चीक काम यात शंकाच नाही. ‘कुहू’ प्रोजेक्टची आर्थिक गणितं कशी जमवली?
‘कुहू’ सुचली आहे त्या स्वरूपात साकारायची ठरलं तेव्हाच आर्थिक बाजू हा कमकुवत दुवा ठरणार हे लक्षात आलं होतं, पण नेटाने सुरु वात केली. वैयक्तिक ओळखीमुळे, मैत्रीखातर अनेकांनी मला लहान मोठय़ा गोष्टींसाठी विनामूल्य सहकार्य केलं, अजूनही करत आहेत तरी स्टुडिओची भाडी, वादकांचं मानधन आणि इतर तांत्रिक खर्च प्रचंड आहेत. ‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी माझ्या मनात जरी संपूर्णपणे साकारली होती तरी प्रकाशकांना प्रत्यक्ष दाखवायला हातात काहीच नव्हतं. तेव्हा त्यांना या कल्पनेत फार काही रस वाटेना. स्पॉन्सर्स मिळवण्यासाठीचे प्रयत्न ‘कुहू’च्या निर्मितीचा भार एकटीने सांभाळून माझ्याच्याने जमण्यासारखं नव्हतं आणि शिवाय त्यांना दाखवायलाही काही तरी मूर्त स्वरूपात तयार असायला हवं होतं नां? कल्पनेचं वारू मुक्त सोडलं होतं आणि नवनव्या कल्पना सुचतच जात होत्या. उदा. ‘कुहू’ पुस्तकाचं कव्हरं थ्री-डी करण्याची कल्पना. खर्च मारु तीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाऊन बजेट २०-२५ लाखांपर्यंत जाऊन पोहोचलं. मग मात्र गाडं पैशांवर येऊन ठप्प झालं. काय करायचं हा मोठ्ठाच प्रश्न होता. त्याच वेळी ‘वॉल्ट डिस्ने’वर यशवंत रांजणकर यांनी लिहिलेलं पुस्तक हाताशी आलं. ते वाचत गेले आणि कर्ज या गोष्टीकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. पुस्तकं एखादा निर्णय घ्यायलाही मदत करतात ती अशी. यातूनच मी सारस्वत बँकेच्या एकनाथ ठाकूर यांना भेटले. त्यांनी याकडे संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं. त्यांच्या सल्ल्यावरून मी ‘कुहू’च्या संकल्पित योजनेचा एक प्रोजेक्ट बनवून तो सारस्वत बँकेकडे सुपूर्द केला आणि बँकेने चक्क शून्य व्याजदराने पाच वर्षांसाठी कर्ज द्यायचं मला मान्य केलं. त्यातही पहिल्या वर्षांत कर्जहप्ते नाहीत आणि पुढची चार र्वष समान हप्त्यांमधून हे कर्ज मी फेडायचं आहे. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक मालमत्ता तारण म्हणून ठेवून दिलेल्या या कर्जाचं अशा तऱ्हेचं निदान भारतातलं तरी हे पहिलंच उदाहरण. (यातून कलावंत, क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात! ‘कुहू’चे महत्त्व यासाठीही.)

‘कुहू’ची बाल-आवृत्ती वेगळी काढण्याची गरज का वाटली?
‘‘आपली मुलं बुद्धिमान बनावीत असं वाटत असेल, तर तुम्ही त्यांना परीकथा ऐकवा आणि ती सर्वश्रेष्ठ बनावीत असं वाटत असेल तर त्यांना अजून जास्त परीकथा ऐकवा!’’ आल्बर्ट आइन्स्टाईनचं हे वाक्य मला फार आवडतं. मुलांना खूप कुतूहल असतं, त्यांना खूप प्रश्न पडतात आणि ते ती मोकळेपणाने विचारतातही. मला अशा प्रश्नांना उत्तरं द्यायला खूप आवडतं. आपल्याला आता कधीच असे प्रश्न पडत नाहीत, जसे लहानपणी पडायचे. ती कल्पनाशक्ती, ती चौकसबुद्धी आपण गमावून बसलो आहोत, हे फार तीव्रतेनं जाणवलं. रंग, शब्द, वास, आवाज.. प्रत्येक गोष्ट मुलं किती आसुसून तीव्रतेनं अनुभवतात आणि किती लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळवतात. ‘भिन्न’च्या काळात मी एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांना गोष्ट सांगायला जायचे, तेव्हा त्यांना कोणत्या गोष्टी सांगाव्या हे कळतच नसे. घर-कुटुंब उद्ध्वस्त झालेली ती मुलं, पराकोटीच्या दु:खातून त्यांचं आयुष्य जात असताना त्यांना नीतिमत्ता, बोध देणाऱ्या गोष्टी सांगणं मला पटेना. मग मी पऱ्यांच्या अद्भुत जगातल्या किंवा जंगलातल्या प्राण्या-पक्ष्यांच्या गोष्टी त्यांना सांगायला लागले. त्यात ती खूप रमताहेत हे दिसत होतं. मुलांसाठी लिहायचं हे त्याच वेळी मनाशी पक्कं केलं होतं. माझी सगळ्या जगाकडे बघण्याची नजरच मुलांमध्ये राहिल्यानं बदलून गेली. हा बदल झाल्यामुळेच मी ‘कुहू’सारखी कादंबरी लिहू शकले. ‘कुहू’ची गोष्ट पऱ्या, भुताखेतांच्या काल्पनिक जगात न रमता आज प्रत्यक्ष दिसणाऱ्या पक्षी- माणूस-प्राणी यांच्या वास्तव जगाचं दशर्न घडवते. पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज, त्यांचे रंगाकार, त्यांचे स्वभाव-सवयी आणि कौशल्ये हे मोठय़ांहून लहानांना अधिक भुरळ घालणारं आणि त्यांचं कुतूहल वाढवणारं आहे. सदाहरित जंगलात घडणाऱ्या या गोष्टीत मुलं बघता-बघता हरवून जातात. पर्यावरण हा विषय आज मुलांसाठी शैक्षणिक महत्त्वाचा बनलेला आहे. जंगलाशी, इतर सजीवांशी माणसानं कसं वागावं याचं शिक्षण मुलांना या कादंबरीतून मनोरंजनाच्या वाटेनं मिळत जातं.
बाल आवृत्तीत गंभीर तत्त्वज्ञान, वर्णनात्मक भाग, मृत्यूसारखे विषय टाळून फक्त गोष्ट आहे. मूळ कादंबरीच्या कथानकाचा हा मुलांना पेलवेल एवढा सारांश आहे. तथापि ती लहानशी गोष्ट नसून दोन भागांत अनेक लहान-लहान प्रकरणे असलेली पूर्ण कादंबरीच आहे. मूळ कादंबरी तीन भागांची आणि २०८ पृष्ठसंख्येची असून बाल आवृत्ती दोन भागांची आणि १०० पृष्ठसंख्येची आहे. मुलांच्या आवृत्तीची भाषा सोपी, साधी आहे.

‘कुहू’ कादंबरी येत्या काही दिवसांतच प्रकाशित होईल. प्रोजेक्ट आता अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आला आहे. अशा वेळी या सर्व धडपडीकडे पुन्हा एकदा बघत असताना नेमक्या काय भावना मनात आहेत?
‘कुहू’ची निर्मिती प्रक्रिया खूप काही नव्याने शिकवून देणारी ठरली. खूप आनंद मिळत गेला प्रत्येक टप्प्यावर. कुहूच्या प्रवासात नकारात्मक विचारांचा हळूहळू निचरा होत गेला. नवी माणसं जोडली गेली. मी एन्जॉय करत गेले ‘कुहू’ची ही वाटचाल. चित्रकाराच्या किंवा साहित्यिकाच्या रोलमधून बाहेर पडून साऊंड रेकॉर्डिग, एडिटिंग, अ‍ॅनिमेशन वगैरे सर्व क्षेत्रांतलं काही ना काही नवं शिकायला मिळालं. नवी दृष्टी मिळाली, नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून एक आत्मविश्वास मिळत गेला.
योग्य माणसे योग्य टप्प्यावर भेटत गेली. आश्चर्य वाटेल, पण ‘कुहू’चं जवळजवळ ७० टक्के काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा झालं आहे, कारण माझे जे स्नेही परिचित मला ‘कुहू’च्या निर्मितीमध्ये मदत करत होते ते जगभर विखुरलेले होते. प्रत्येकजण आपापल्या जागी बसून काम करत होता आणि इंटरनेटचा दुवा आमच्यामध्ये होता. ‘कुहू’ कादंबरीला एक ग्लोबल प्रेझेन्स यातून मिळत गेला तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. कधी तांत्रिक अडचणी यायच्या, चुका व्हायच्या, वेळेचं, पैशांचं नुकसान व्हायचं, माणसं अपेक्षाभंग करायची, पण प्रत्येक चूक हा शिकायला मिळालेला एक नवा धडा असा दृष्टिकोन ठेवला. को-ऑर्डिनेशन, एकमेकांवरचा विश्वास, आदर यामुळे काम सोपं झालं. नवी जनरेशन सीन्सिअर, प्रोफेशनल तर आहेच, पण काम एन्जॉय करत कसं करावं हे मी त्यांच्याकडून शिकत गेले.
आत्तापर्यंत केलेल्या लिखाणात भाविनकदृष्टय़ा गुंतत जाण्याची सवय होती. त्याचा त्रासही सोसला होता, पण आपल्या कादंबरीला एक प्रॉडक्ट मानून त्याच्या निर्मितीनंतर त्यातली भावनिक गुंतवणूक बाजूला ठेवून व्यावहारिक पातळीवर तटस्थपणे विचार करू शकण्यापर्यंतचा एक प्रवासही यात झाला. तणाव होतेच. सर्वाचं कितीही सहकार्य ‘कुहू’च्या निर्मितीमध्ये असलं तरी अंतिम निर्णयाची जबाबदारी आपल्यावरच आहे, ही जाणीव मनावरचा ताण वाढवणारी होती. क्रिएटिव्ह आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाजू एकाच वेळी सांभाळणं सोपं नव्हतं. लेखन, पेंटिंग्ज, नव्या माध्यमांना जाणून घेणं, तांत्रिक बाबी, पुस्तकाची मांडणी, वेबसाइट, ब्लॉग, जाहिराती, माणसांना सांभाळणं या सगळ्याचं दडपण प्रचंड होतं, पण काय हवंय हे मात्र मला निश्चित माहीत होतं. विचारांना एक ठामपणा येत गेला. स्वभावात शांतपणा आणि संयम आला, शिस्त आली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

‘कुहू’नंतर काय?
‘कुहू’च्या कल्पनेची ट्रायोलॉजी करायची कल्पना डोक्यात आहे. ‘कुहू’चं जग हे पक्ष्यांचं, आकाशात विहरणारं. त्यानंतर एक सागराच्या पोटात घडून येणारी कहाणी डोक्यात आहे. त्यापुढचं जग असेल जमिनीवरचं.
कविताचं बोलणं ऐकत असताना मला अपरिहार्यपणे पुन्हा एकदा वॉल्ट डिस्ने आठवला. तो एकदा म्हणाला होता, ”Disney Land Will Never Be Completed. It Will Continue To Grow As Long As There Is Imagination Left In The World.”