आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी ( ३० जुलै ) थेट शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती उपस्थित का नव्हता? असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. याला ठाणे शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“आनंद दिघे यांचा अपघात झाला होता की अन्य काही? तर तो चौकशीचा भाग आहे. पण, आनंद दिघे यांनी शिवसेनेसाठी आपलं आयुष्य वेचलं होतं. आनंद दिघे सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत होते. मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती का उपस्थित नव्हता?” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
संजय शिरसाट यांचा हा दावा केदार दिघे यांना खोडून काढला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना केदार दिघे म्हणाले, “आनंद दिघे यांच्या पार्थिवावर उद्धव ठाकरे हार घालत असतानाचा फोटो आहे. खरेतर फोटो दाखवण्याची गरज नाही. कारण, शिवसेना सोडून गेलेल्या मंडळींना आता जाग असून, ते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.”
“स्वत:चा स्वार्थ साधता येत नाही. मंत्रीमंडळात कुठेही जागा मिळत नाही, तेव्हा अशी बेताल वक्तव्य करायची. वरिष्ठ आपल्यावर कृपादृष्टी करतील आणि मंत्रीपदाची भीक मागतोय, ती पदरात पडेल, या अनुषंगाने ही लोक वक्तव्य करत आहेत. लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.