शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी केल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवहाटीमध्ये असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने पडण्याची भिती व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकही आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे निर्माण झालेली पोकळी कोण भरुन काढणार याबद्दल मतप्रदर्शन केलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये स्पेस निर्माण झालीय. तर आता नेतृत्व कोणाकडे अशी चर्चा सुरु झालीय. काहीजण तुमचं यासंदर्भात चर्चा करत आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न केदार दिघेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना केदार दिघेंनी, “मी गेल्या २१ वर्षांपासून, आनंद दिघे साहेब गेल्यानंतर मी ठाणे आणि पालघर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेअंतर्गत असणाऱ्या युवासेनामध्ये कार्यरत होतो. मी वयाच्या ३८ व्या वर्षी त्या पदाचा राजीनामा दिला. कारण माझी इच्छा अशी होती की पाठच्या येणाऱ्या तरुणींनी या संघटनेसाठी काम करावं,” असं सांगितलं.
पुढे बोलताना, “राहिली गोष्ट एकनाथ शिंदेंनंतर जागा भरुन काढण्याची तर एकनाथ शिंदे मंत्री होते. अनेक वर्ष आमदार होते. जिल्हाप्रमुख होते, संपर्क प्रमुख होते. अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहे. माझ्याकडे ना पद होतं ना, ना आमदार, ना खासदार, ना कुठल्या पद्धतीच्या पदावर होतो. मी स्वत:ला एखादा सर्वसामान्य कर्यकर्त्याप्रमाणे समजतो. तर मी ही जागा भरुन काढेन का? तर मला असं वाटतं की तुलना तेव्हाच होते जेव्हा बरोबरीची लोक समोर असतात. राहिली गोष्ट माझ्याबद्दल तर दिघेसाहेबांचा पुतण्या म्हणून मी संघटन बळकट करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी माझ्यापद्धतीने पूर्ण प्रयत्न करेन,” असं म्हटलं आहे.