राज्यसरकारने काढलेली श्वेतपत्रिका म्हणजे अजित पवारांना दिलेली क्लीन चिट आहे. या श्वेतपत्रिकेचा आम्ही निषेध करतो. सर्व पक्षांचे नेते चोर आहेत. त्यांनी देशाला लुटण्याचेच काम केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम आदमी पार्टीला १०० टक्के सत्ता द्या, पुढच्या १५ दिवसांत देशात लोकपाल लागू होईल, असे आश्वासन आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी दिले. ते रोहा येथे रविवारी जाहीर सभेत बोलत होते.
देशात सकारात्मक बदल करणे आमचे काम आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ते करणार आहोत. देशातील सर्वच पक्षांचे नेते चोर आहेत आणि त्यांनी देशाला लुटण्याचे काम केले आहे. मात्र आम्ही हे सहन करणार नाही, असेही केजरीवाल म्हणाले.
 देशाचा कारभार अंबानी बंधू चालवितात, असा आरोप त्यांनी या वेळी केला. अनिल आणि मुकेश अंबानी यांचे ४०० कोटी रुपये स्विस बँकेत असल्याचा दावा त्यांनी केला. या दोघांनी देशाला लुटले आहे. मी जर खोटे बोलत असेन तर त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा, असे आव्हानही त्यांनी अंबानी बंधूंना दिले. अंबानी बंधूंचा स्विस बँकेतील अकाऊंट नंबर त्यांच्याकडे असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
आपल्या भाषणात त्यांनी, नितीन गडकरी आणि रॉबर्ट वडेरा यांच्यावरीही टीका केली. रॉबर्ट वडेरा यांनी शेतकऱ्यांकडून साडेआठ कोटींना जागा घेतली आणि ती जागा विकसित करून ५८ कोटींना विकली, असा खळबळजनक आरोप त्यांनी या वेळी केला. सर्व पक्षांचे नेते भूमाफीया झाले आहेत. ब्रिटिश गेले असले तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही, आता आपल्याला खऱ्या अर्थाने ‘आझादी’ मिळवायची असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेला अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे प्रशांत भूषण, मयंक गांधी, अंजली दमानिया, कुमार विश्वास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, शेकापचे जयंत पाटील, गोपाळ दुखंडे उपस्थित होते.

Story img Loader