कोकणात शेतीकामांसाठी राबणाऱ्या मजुरांत परप्रांतीयांची संख्या वाढत असतानाच कोकणातील शेतीही आता परप्रांतीयांच्या ताब्यात जाऊ लागली आहे. नैसर्गिक रबर शेतीत आघाडीवर असलेल्या केरळमधील रबर उत्पादन आर्थिक अडचणीत सापडल्याने तेथील शेतकऱ्यांनी आता कोकणात धाव घेतली असून कोकणातील चारही जिल्ह्यांतील जमिनी करार, साठेखत करून त्यावर रबरशेती केली जात आहे. सध्या कोकणातील चारही जिल्ह्य़ांत दोन हजार १०० हेक्टर्सवर रबर लागवड आहे. त्यात सावंतवाडी व दोडामार्ग तालुका आघाडीवर आहे.
कोकणात मुबलक पाणी स्रोत ठिकाणे असणाऱ्या दऱ्या-खोऱ्यातील जमिनी केरळीयन शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत. काही ठिकाणी करार, साठेखतावरही या जमिनी घेऊन रबर उत्पादन सुरू केले आहे. काजू, कोकम, नाचणी अशा विविध उत्पादनांसोबत वनौषधी झाडे, जंगल असणाऱ्या जमिनी अल्प किमतीत केरळीयन शेतकऱ्यांनी खरेदी करून या ठिकाणी रबर लागवड केली आहे. ही रबर लागवड सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत सर्वाधिक आहे.
रबराचे लागवड क्षेत्र
*सिंधुदुर्गात १८३१.४७ हेक्टर्सवर रबर लागवड असून, यात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्याचा प्रत्येकी ५० टक्के समावेश.
*रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, मंडणगड, चिपळूण, राजापूर भागांत २१६ हेक्टर्स.
*ठाणे जिल्ह्य़ात वाडा, दापचेरी, डहाणू भागांत ४६ हेक्टर्स तर रायगडमध्ये मुरबाड, माणगाव भागांत मिळून ५.६५ हेक्टर क्षेत्रात रबर लागवड.
रबर बोर्डही कार्यान्वित
सिंधुदुर्गात २८ हजार ६२० हेक्टर्सवर आंबा तर काजू ६३ हजार ८५० हेक्टर्सवर घेतला जात असूनही आंबा-काजू बोर्डाचे स्वप्न नुकतेच साकारीत आहे. पण केरळी शेतकऱ्यांनी कोकणात अल्पावधीत रबर बोर्डाचे प्रादेशिक कार्यालय सावंतवाडीत तर उपप्रादेशिक कार्यालय गोवा राज्यात स्थापन केले आहे. त्याशिवाय केरळी शेतकऱ्यांनी ७० हेक्टर्सवर काजू लागवड करून काजू व कोको विकास मंडळ कोची पुरस्कृत योजना कोकण व कोल्हापूर जिल्ह्य़ांचा समावेश केला आहे. रबर सरासरी एक हेक्टरपासून १७०० किलो ते २००० किलोपर्यंत सुका रबर वर्षांला मिळू शकतो.

Story img Loader