पोलीस ठाण्यात दुचाकीवर बसून तिघेजण येतात, उघडय़ावर धूम्रपान करतात याचे केरळच्या पोलिसांना मोठे आश्चर्य वाटले. केरळमध्ये वाहतुकीचे नियम वाहनचालकांनी पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, असे त्यांनी सांगितले.
शहरातील इराणी टोळीने केरळच्या त्रिचूर शहरात जाऊन अनेक महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले होते. टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने शहरातील ठाकूर ज्वेलर्सचा मालक मनिष अरुण ठाकूर यास ३५ तोळे दागिने विकले होते. ठाकूर यास त्यांनी ताब्यात घेऊन चोरलेले दागिने हस्तगत केले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक लाल कुमार यांच्या नेतृत्वाखालील १२ पोलिसांचे पथक शहरात आले होते. त्यांनी शहरातील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.
केरळमध्ये दुचाकीचालकांना हेल्मेट सक्तीचे आहे. हेल्मेटअभावी विनावाहन चालविल्यास ५०० रुपयांचा दंड केला जातो. दुचाकीवर तीन जण बसून चालल्यास कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी दारू पिल्यास पाच हजाराचा दंड ठोठावला जातो. उघडय़ावर धूम्रपान केल्यास ५०० रुपयांचा दंड होतो. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते असे केरळ पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. महाराष्ट्र राज्यात पोलीसच वाहतुकीचे नियम पाळत नाहीत याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्ती केली आहे. एकाही पोलिसाच्या डोक्यावर हेल्मेट दिसले नाही, असे त्यांनी सांगितले.
केरळमध्ये फसवणुकीच्या घटना जास्त घडतात. तसेच तरुण भरधाव वेगात वाहने चालवून लोकांना दुखापत करतात. या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली तरी गुन्हे नोंदवून घ्यायला पोलीस नकार देऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. केरळमध्ये पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. या पर्यटकांना त्रास होणार नाही, याची दक्षता जास्त घेण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत असे त्यांनी सांगितले. श्रीरामपूर शहरातील इराणी टोळी देशभर गुन्हे करते. केरळ पोलिसांनी त्यांची माहिती जमा करण्यास प्रारंभ केला आहे. स्थानिक पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. ते येथे गुन्हे करत नसले तरी त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असे मत केरळ पोलिसांनी व्यक्त केले.

Story img Loader