केरळीय लोकांकडून वन्यप्राण्यांची हत्या करून मांस गोवा राज्यासह केरळ राज्यात विक्री करण्यात येत असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाली असून, गवा रेडय़ाचे १३६ किलो मांस पिशवीत भरताना दोघा केरळीय कामगारांना अटक करण्यात आली. यामध्ये स्थानिक सूत्रधार असल्याचे उघड होताच ताब्यात घेण्यात आले. वनाचे संरक्षण करणाऱ्या झोपी गेलेल्या अधिकाऱ्यांना धक्का देणारे हे कृत्य आहे, असे पर्यावरणप्रेमींनी बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वनौषधींची कत्तल करून डोंगरकपारीत अननस, रबर लागवड केली जात आहे. या कृषी उत्पादनाच्या आडून गांजा, अफूची लागवड व सापांची तस्करी आणि वन्यप्राण्यांची हत्या करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे, पण झोपी गेलेल्या वन खात्याला पुरावा सापडत नव्हता. भिकेकोनाळ येथे वन्यप्राण्याची हत्या उघडकीस आली. गवा रेडय़ाचे मांस साफ करून ते पिशवीत भरणाऱ्या दोघा केरळीयांना वन खात्याच्या पथकाने ताब्यात घेतले. त्या वेळी गवा रेडय़ाची मान, १३६ किलो मटण त्यांना सापडले. भरारी पथकाचे उपवनसंरक्षक शिरोडकर, साहाय्यक वनसंरक्षक बागेवाडी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
सांबर, वनगवे, रानडुक्कर अशा प्राण्यांची हत्या करून हे मांस गोवा राज्यात विक्री केले जात होते, असे रंगेहाथ पकडलेल्या केरळीयांनी वन खात्याच्या पथकाला सांगितले तेव्हा त्या दोघाही केरळीयांनी स्थानिक सूत्रधाराचे नाव या पथकासमोर स्पष्ट करताच त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
जंगलातील प्राण्यांची शिकार करून मांस विक्री करण्यात येत असल्याचे केरळीयांनी सांगितले. केरळीय के. आर. प्रसाद व के. व्ही. पीयूष अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी आपण वन्यप्राण्यांचे मांस हातावेगळे करीत असल्याचे मान्य केल्याचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील केरळीयांचे साम्राज्य चिंताजनक असून तेथील संस्कृती व पर्यावरण बिघडण्याची भीती असूनही सरकार व राजकीय पातळीवर त्यांना सपोर्ट मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींत प्रचंड नाराजी आहे.
वनजमिनीत केरळीय लोकांनी बेसुमार वृक्षतोड केली आहे. त्याकडे वन खात्याने कायमच दुर्लक्ष केले आहे. वनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या वन खात्याने लोकांनी वृक्षतोडीच्या तक्रारी करूनही दुर्लक्ष करतानाच जंगली प्राण्यांची हत्या व सापाच्या विषाच्या तस्करीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नाराजी आहे.
वनगवा रेडय़ांची हत्या व मांस विक्रीच्या प्रकाराविरोधात वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. वनचौकशी सोबतच पोलीस चौकशी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी लावून धरली आहे.