काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देशाबाहेर जाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूध्द विखारी वक्तव्य करणे आक्षेपार्ह असून याचे उत्तर जनताच लोकसभा निवडणूकीत जनताच देईल असे मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले.
सांगली लोकसभा मतदार संघातील दौर्यादरम्यान मौर्य यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना श्री. मौर्य म्हणाले, नैराश्याच्या विळख्यात देश सापडला होता, अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती धेतली. गेल्या नउ वर्षाच्या कालखंडात नैराश्यातून आत्मनिर्भर भारत बनविण्याचे प्रयत्न केले. सध्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचच्या क्रमांकावर असून ती पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सबका साथ, सबका विश्वास आणि विकास या धोरणातून प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा >>> “७०० एकर जमीन कुठून आणली”, खैरेंच्या विधानावर संदीपान भुमरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
मोदींना रोखण्यासाठी विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांच्याकडे कोणताही चेहरा अथवा मुद्दाच नाही. यामुळे यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीही मोदींना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील असली तरी त्यांना यामध्ये यश मिळणार नाही. देशविकासाचे कोणतेही मुद्दे जवळ नसताना विरोधक केवळ मोदी या नावाला विरोध करीत असून त्यांना मोदी फोबिया झाला आहे.
कुस्तीपटू करीत असलेल्या मागण्याबाबत विचारले असता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने कोणतेही वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री मौर्य यांनी बोलणे टाळले. तर उत्तर प्रदेशामध्ये तथाकथित समाज कंटकांचा पोलीस चकमकीत मृत्यू होत असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गुंंडाशी झालेल्या चकमकीमध्ये काही पोलीेसही जायबंदी होत आहेत. असे प्रकार जाणीवपूर्वक होत आहेत असे म्हणता येणार नाही. कोणीही दोषी असो त्याच्यावर न्यायालयीन प्रक्र्र्रियेद्बारे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> अमरावतीच्या युवकांची शरद पवारांना धमकी, मात्र २०११ मध्ये ते कृषिमंत्री पदावर असताना दिल्लीत नेमके काय घडले होते?
दरम्यान, उपमुख्यमंत्री मौर्य यांनी आज सकाळी सांगलीत गणेश मंदिरात जाउन गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा केली. टिळक स्मारक मंदिरामध्ये पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी संवाद साधला. तर दुपारी मिरजेत दुचाकी रॅली काढण्यात आली. यानंतर सायंकाळी कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, मोहन वनखंडे आदी उपस्थित होते.