मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यासंदर्भात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याप्रकरणी आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया ट्वीट करत मोदी सरकारवर टीकास्र सोडलं होतं. दरम्यान, यावरून केशव उपाध्ये यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांनी नेमकं काय ट्वीट केलं होतं?
“राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू”, अशी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया संजय राऊतांनी ट्वीट केली होती.
केशव उपाध्येंचा संजय राऊत, उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
दरम्यान, यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. चोराला चोर म्हणणं गुन्हा ठरला आहे, या वाक्याचा अर्थ ओबीसी समाजाला आपणही चोर समजता का? असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी विचारला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या विधानाचं समर्थन करताना आपण ओबीसी समाजाचा अपमान करत आहात, असेही ते म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संदस्यत्व रद्द करण्यात आलं