गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून संघर्ष सुरू होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यानुसार काल निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता यावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत मुखमंत्रीपदाच्या लोभानेच हे चिन्ह गेले असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – “माझ्या मते उद्धव ठाकरे…”; ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

काय म्हणाले केशव उपाध्ये?

भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. “मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला, इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले”, असे ट्वीट उपाध्ये यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाने काल उद्धव ठाकरेंना धक्का देत ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला. याबरोबच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असेही आयोगाकडून सांगण्यात आले. त्यामुळे दोन्ही गटाला ‘ठाकरे गट’ आणि ‘शिंदे गट’, अशी नावे वापरावी लागणार आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.