केंद्र सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये आठवडय़ातील एक दिवस ‘खादी’ अनिवार्य केल्यामुळे मागील तीन ते चार महिन्यांत  राज्यातील खादीचा खप तीन पट वाढला आहे. सरकारच्या निर्णयामुळे खादी उद्योगास खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र खादी कपडय़ाचे दर अधिक असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी चरख्या ऐवजी यंत्राद्वारे निर्मिलेल्या खादी कपडय़ांना पसंती देऊन पर्यायी मार्ग शोधला आहे.

काही वर्षांत दैनंदिन वापरात ‘फॅशनेबल’ तसेच ‘सिंथेटीक’ कपडय़ांना प्राधान्य दिले जात होते. त्याचे त्वचेवर होणारे परिणाम लक्षात घेऊन आता सुती कपडय़ांकडे अनेकांचा कल आहे. फॅशनच्या बदलत्या प्रवाहात खादी कायम दुर्लक्षित राहिली. कारण, खादीच्या वस्त्र प्रावरणांची किंमत इतर प्रकारांपेक्षा अधिक असते. राष्ट्रीय सण किंवा एखाद्या प्रचार सभेपुरता खादीचा अधिक्याने वापर होत असल्याने बाजारपेठेचा तुलनात्मक अभ्यास करता फॅशन आणि किंमत यांचा ताळमेळ न बसल्याने खादीच्या कारागीरांवर उपासमारीची वेळ आली. या पाश्र्वभूमीवर, केंद्र सरकारने ग्रामीण भागातील खादी कारागीरांच्या व्यवसायाला चालना मिळावी, या व्यवसायाशी संबंधित रोजगार निर्मिती व्हावी, याकरीता सरकारी कार्यालयात आठवडय़ातील किमान एक दिवस खादीचा पोशाख अनिवार्य करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्देशानंतर साडी, कुर्ती, शर्टस यांची मागणी वाढली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत खादी वस्त्रप्रावरणांचा खप तिप्पट झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्या पाटील यांनी सांगितले.

राज्यात साधारणत पाच ते आठ हजार कारागीर या व्यवसायावर अवलंबून आहेत. अमरावती, वर्धा, नांदेड, चंद्रपूर या ठिकाणी प्रामुख्याने चरख्यावर सूत कताईचे काम चालते. या भागात मुबलक कापूस होत असल्याने चरख्यावर सूत तयार करणे व त्यावर विशिष्ट प्रकियेद्वारे खादी कापडाची निर्मिती होते. कापड तयार झाल्यानंतर मागणीनुसार इतर जिल्ह्यात कपडे तयार करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठविले जाते. आता कारागीरही फॅशनचा अभ्यास करत त्यात कलाकुसर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी लखनवी भरतकाम, वारली चित्रशैली कपडय़ांवर करण्यात येते. मात्र त्या त्या कलाकुसरीनुसार त्याचे दर वाढत जातात. इतर कपडय़ांच्या तुलनेत दर अधिक असले तरी हे कपडे जास्त काळ टिकतात. शिवाय त्वचेसाठी अपायकारक नसल्याचे पाटील यांनी सांगितले. चरख्यावरील खादीचे दर तुलनेत अधिक असतात. यंत्रावर निर्मिलेल्या खादीचे दर काहिसे कमी असतात. त्यामुळे काही जणांकडून यंत्रावर निर्मिलेल्या कपडय़ांचा पर्याय स्विकारला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader