शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा निधी कमी देतात आणि जाहिरात जास्त करतात या टीकेसह खासदार चंद्रकांत खैरे यांनी ते लोकसभा निवडणुकीत विरोधात उभे राहिले तर त्यांची ‘जिरवू’, असे म्हटले आहे. महायुतीच्या वतीने शहरातील क्रांती चौकात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनादरम्यान त्यांनी पहिल्यांदाच दर्डा यांच्यावर जाहीर टीका केली. कोळसा घोटाळय़ात त्यांचा हात असल्याच्या आरोपासह रस्त्यासाठी कमी निधी देऊन उद्घाटने कशी केली जात आहेत, याची माहिती शिवसैनिकांना दिली. महायुतीचे नेते व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. पण निदर्शनादरम्यान त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी होती.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात घेतलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत खासदार खैरे यांनी दर्डा यांच्या कारभारावर भाष्य केले नव्हते. पूर्व विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींबाबत ब्र काढत नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर शिवसेनेत खैरे आणि दर्डा यांच्यातील राजकीय मेतकुटाची चर्चा चांगलीच रंगली होती. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे टीका करतात आणि खासदार खैरे त्याच बैठकीत काहीच बोलत नाहीत, असे शिवसैनिकांच्याही लक्षात आले. त्यानंतर महायुतीच्या निदर्शन सभेत पहिल्यांदाच खैरे यांनी दर्डा यांच्यावर टीका केली. गेल्या १५ दिवसांपासून लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून दर्डा यांचे नावही जाणीवपूर्वक पेरले जात आहे. या पाश्र्वभूमीवर खैरे यांनी जाहीर टीका केली. कमी निधी देऊन अधिक जाहिरात करतात, अशा शब्दांत या पूर्वी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी टीका केली होती. हे वाक्य जशास तसे आज खैरे यांनीही उच्चारले. शिवाय, त्यांच्यावर कोळसा घोटाळय़ाचा आरोप असल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत दर्डा उतरले तर?, असे विचारताच खैरे म्हणाले, की ‘१९९५ मध्ये राजेंद्र दर्डा यांचा ५५ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत उतरले तर त्यांची जिरवू.’
महायुतीच्या निदर्शनाच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांची उपस्थिती तुलनेने खूपच कमी होती. याविषयी खैरे म्हणाले, उपस्थिती कमी नाही. लग्नसराईचे दिवस असतानाही मोठय़ा संख्येने शिवसैनिक आले आहेत. या वेळी शिवसेनेने काही मंत्र्यांना भ्रष्ट ठरवून त्यांचे पुतळेही जाळले. पोलिसांनी या वेळी कार्यकर्त्यांना विरोध केला.

Story img Loader