१०० बेपत्ता, ९३ जणांना वाचविण्यात यश; रायगडमधील तीन वर्षांतील दुसरी दुर्घटना

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रायगड पूरस्थितीशी झुंजत असताना खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीला बुधवारी मध्यरात्री डोंगरसमाधी मिळाली. इरशाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या वाडीवर दरड कोसळून १६ जणांचा झोपेतच अंत झाला. या दुर्घटनेत १०० जण बेपत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज असून, ९३ जणांना वाचविण्यात यश आले. जुलै २०२१ मध्ये तळीये येथील दरड दुर्घटनेनंतर रायगडमधील ही दुसरी दुर्घटना आहे.

रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खालापूरमधील इरशाळवाडी येथे दरड कोसळली आणि ३५ घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा आणि बचाव पथके रात्रीच घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी स्थानिक पथकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. मात्र, मुसळधार पाऊस आणि दुर्गम भागामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. गुरुवारी सकाळी ‘एनडीआरएफ’ आणि ‘टीडीआरएफ’ची पथके घटनास्थळी दाखल झाली.

इरशाळवाडीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने यंत्रसामुग्री नेणे अशक्य बनले. त्यामुळे मनुष्यबळाच्या मदतीने दिवसभर बचावकार्य सुरू होते. त्यासाठी सरकारने दोन हेलिकॉप्टर तैनात ठेवली होती. मात्र, दिवसभर पावसाची संततधार कायम राहिल्याने त्यांचा वापरच करता आला नाही. दिवसभरात १६ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. सात जखमींनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

इरशाळ आदिवासी वाडीत ४८ कुटुंबांतील २८८ जण वास्तव्याला होते. त्यापैकी ९३ जण सुखरूप असल्याची समोर आले आहे. १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण बेपत्ता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. ‘एनडीआरएफ’ची ४ पथके, ‘डिडीआरएफ’चे ८० जवान, स्थानिक आपत्ती प्रतिसाद दलाची ५ पथके यांच्या मदतीने गुरुवारी बचावकार्य सुरू होते. अंधार झाल्याने संध्याकाळी बचावकार्य थांबविण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्यास सुरूवात करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दादा भुसे, गिरीश महाजन, उदय सामंत, आदिती तटकरे या मंत्र्यांबरोबरच आदित्य ठाकरे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मदतीसाठी गिर्यारोहकांची धाव

दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी गिर्यारोहक धावून गेले. रायगड जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र माऊंटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरशी (एमएमआरसीसी) रात्री एक वाजता संपर्क साधला. त्यानंतर ‘एमएमआरसीसी’शी संलग्न असलेल्या खोपोलीच्या यशवंती हायकर्सचे गिर्यारोहक बचावकार्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपकरणांसह सर्वप्रथम रात्री दीडच्या सुमारास इरशाळवाडीजवळ पोहोचले. त्यापाठोपाठ निसर्ग मित्र – पनवेल, बदलापूरवरून अजिंक्य हायकर्स, शिवदुर्ग मित्र-लोणावळा आदी संघटनांचे गिर्यारोहकही घटनास्थळी दाखल झाले.

मुख्यमंत्री घटनास्थळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेतला. त्यांच्यापाठोपाठ काही मंत्रीही घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. इरशाळवाडीचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

नवी मुंबई : इरशाळवाडीमध्ये बचावकार्यासाठी जाताना नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम यशवंत ढुमणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हे पथक रात्री १ वाजताच्या सुमारास घटनास्थळाकडे रवाना झाले होते. या दुर्गम भागात वाहने पोहोचू शकत नसल्याने पथकातील जवान आवश्यक साहित्य घेऊन पायीच जात असताना ढुमणे यांचा मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी

ठाणे : पुढील दोन दिवस ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा-महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली असली तरी पुढील ४८ तास जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : गेले दोन दिवस मुंबई, ठाणे, नवी मुंबईला झोडपणाऱ्या पावसाने गुरुवारी उसंत घेतली. मात्र, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. माथेरानमध्ये सरासरी ४०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत शुक्रवारी अतिमुसळधार तर ठाणे, पालघर रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.