पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या सापाला पुढे जाण्यासाठी खंबाटकी घाट काही वेळासाठी थांबला. एरवी अपघातामुळे, वाहनांची गर्दी होत रांगा लागल्याने, वाहन बंद पडल्याने महामार्गावरील वाहतूक थांबल्याचे अनेकदा अनुभवले गेले होते. मात्र, एका सरपटणाऱ्या जीवासाठी वाहतूक थांबण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पुणे – सातारा मार्गावर खंबाटकी घाटात वाहने बंद पडणे,वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक कारणाने वाहतूक थांबते. वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. तासनतास प्रवासी आणि वाहने अडकून पडतात. वाहतूक बोगदा मार्गे वाळवावी लागते. यावेळीही घाट रास्ता काही वेळासाठी थांबला. घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेकांना वाटले वाहतूक कोंडी झाली, वाहन बंद पडले किंवा एखादा अपघात झाला. परंतु प्रवाशांनी प्रत्यक्ष माहिती घेतल्यावर या घटनेची एकच चर्चा सुरू झाली.
खंबाटकी घाटातील रस्त्यावर जवळच्या जंगलातून आलेला एक सरपटणारा जीव महामार्गावर उतरला होता. वाट चुकल्याने तो महामार्गावर आला खरा परंतु पुढे कुठे जावे त्याला समजेना. गरम झालेला रस्ता आणि सततची भरधाव वाहतूक यामुळे हे नागराज चांगलेच कोंडीत सापडल्याचे चित्र होते. दुसरीकडे त्याला वाचवण्यासाठी वाहन चालकांचाही गोंधळ उडू लागला.
या दरम्यान भुईंजच्या महामार्ग पोलीस पथक घटनास्थळी आले. त्यांनाही हे नागराज रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ लिमन यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर नलवडे, अविनाश डेरे, रवींद्र कचरे, पोलीस हवालदार विकास कदम, हेमंत ननावरे, मिथुन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष कचरे आणि शफीक शेख आदी पथकाने प्रसंगावधान दाखवत रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवली आणि नागराजाला सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत केली. त्यानंतर नागराजाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. एरवी अपघातामुळे, वाहनांची गर्दी होत रांगा लागल्याने, वाहन बंद पडल्याने महामार्गावरील वाहतूक थांबल्याचे अनेकदा अनुभवले गेले होते. मात्र, एका सरपटणाऱ्या जीवासाठी वाहतूक थांबण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.