सांगली : खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) सुहास बाबर आणि वैभव पाटील लढत अंतिम मानली जात असली तरी विरोधात तुतारी की मशाल याचा निर्णय जागा वाटपानंतर समोर येणार आहे. सध्या दोन्ही बाजूंनी प्रचाराची यंत्रणा सज्ज असून केवळ उमेदवारी जाहीर होण्याचीच प्रतीक्षा आहे.

खानापूर मतदारसंघात आटपाडी तालुक्यासह तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावांचा समावेश आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेना (शिंदे) गटाचे अनिल बाबर यांच्याकडे होते. त्यांच्या पश्चात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तसे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच केले आहे.

हेही वाचा : खासदार श्रीकांत शिंदेंनी बंदी असूनही केला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश; विरोधकांची टीका!

तथापि, मागील दोन वर्षांपासून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. या गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदही सध्या त्यांच्याकडे आहे. मात्र, खा. शरद पवार यांची सांगली दौऱ्यामध्ये भेट घेऊन या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत पुण्यात मुलाखतीसही हजर राहिले.

हेही वाचा :सांगोल्याचे राजकारण ‘सांगली पॅटर्न’च्या दिशेने! शेकापच्या बालेकिल्ल्यावर ठाकरे गटाचा दावा

मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खानापूरची जागा शिवसेना (ठाकरे) गटाला की राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे त्यांनी दोन्ही पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे. शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुतेही याच मतदारसंघातील आहेत. त्यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. जर ही जागा शिवसेना (ठाकरे) गटाच्या वाट्याला आली तर आपल्या नावाचा उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल असा विश्वास पाटील यांना आहे. यामुळे खानापूर मतदारसंघात बाबर विरुध्द पाटील ही पारंपरिक लढत होणे अपेक्षित असले तरी मतदान यंत्रावर तुतारी की मशाल हे आघाडीच्या जागा वाटपावर अवलंबून आहे.