भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार दिला जातो. दिल्ली येथील हॅबिटॅट सेंटर येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात संकेतस्थळाशी संबंधित मिलींद महाजन व अमरदीप करोडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘डिजिटल इंक्लुजन फॉर डेव्हलपमेंट’ अशा आशयाचा पुरस्कार ६६६.‘ँंल्लुिंँं’ी.ूे या संकेतस्थळास देण्यात आला आहे. विविध प्रादेशिक भाषेतील पर्यायी शब्दकोष, संगणक-प्रणाली, वेब-सेवा, मोबाईल तसेच टॅबलेट उत्पादन, लघू संदेश सुविधांची निर्मिती करून त्या जगभर लोकप्रिय केल्याबद्दल या संकेतस्थळाची प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.  पुरस्कार वितरण सोहळ्यास परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्याच महिन्यात खांडबहालेंच्या भारतीय भाषा शब्दकोश संकेतस्थळाने प्रतिमहिना एक कोटी हिट्सचा महत्वपूर्ण टप्पा पार करण्यात यश मिळविले होते. भारतीय प्रादेशिक भाषांच्या आदानप्रदानासाठी प्रसिद्ध असलेल्या या संकेतस्थळाला जगभरातून दररोज लाखो लोक भेट देत असतात. भाषातज्ज्ञ, भाषांतरकार, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हे संकेतस्थळ लोकप्रिय आहे. गुगलसारख्या सर्च इंजिनने आपणहून या संकेतस्थळाचे एकूण ५३ लाख ५० हजार पानांचे सूचीकरण आपल्या संग्रहात करून घेतले आहे. मायक्रोसॉफ्टने भारतीय भाषा उद्योगप्रमुख म्हणून या संकेतस्थळाचा गौरव केला आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामीळ, तेलगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, बंगाली, संस्कृत अशा विविध भाषांमधील ४० लाखांहून अधिक शब्दसंग्रह असलेले शब्दकोष या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे शब्दकोष सर्वासाठी मोफत असून मोबाइल टॅब्लेट्सवरही हे शब्दकोष डाऊनलोड करता येतात.

Story img Loader