सावंतवाडी: तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयाला लागून असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे गावातील काळा दगड खाणी प्रकल्पामुळे खानयाळे गावातील लोकांनी रोष व्यक्त करत आज चौथ्या दिवशी उपोषण सुरू ठेवले आहे. मात्र या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही तर जिल्हाधिकारी यांनी साधी विचारपूस देखील केली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिलारी धरणाच्या जलाशयाला लागून काळा दगड खाणी आहेत. यातील काही ठिकाणी नियमांचे पालन करून खाणी सुरू केल्या तर एक दोन खाण धारकांनी चक्क डोंगर कापून नियम धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खनन सुरू केले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शिरंगे खानयाळे गाव धोक्यात आला आहे. तर दुसरीकडे सरकार धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसे झाले तर खानयाळे शिरंगे बोडण गाव बुडीत क्षेत्रात येऊन गाव खाली करावे लागतील अशी परिस्थिती चुकिच्या पध्दतीने काळा दगड खाण प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले.

तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प आणि शिरंगे,खानयाळे गावातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून काळा दगड खाण प्रकल्प धारकांसह शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे,पण तसे झाले नाही म्हणून आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरू ठेवण्यात आले आहे. भुर्गभ शास्त्रज्ञ यांना या ठिकाणी पाचारण करून तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या मातीच्या धरणाला धोका निर्माण होईल किंवा कसे? याबाबत जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा केली पाहिजे,पण त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

धरणाच्या ठिकाणी असलेल्या दगड खाणी विषय केवळ खानयाळे गावासाठी मर्यादित नाही तर दोडामार्ग तालुका, गोवा राज्य यासाठी धोक्याची घंटा आहे. असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. पालकमंत्री नितेश राणे, माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा आहेत. ते आंदोलन स्थळी आले असते तर वस्तुस्थिती दाखवून देता आली असती असे संकेत शेट्ये यांनी सांगितले. यावेळी सरपंच हरिश्चंद्र नाईक, लक्ष्मण गावडे, सुहास शेट्ये यांच्यासहित गावातील सुमारे १५० पुरूष व महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे असे संकेत शेट्ये यांनी बोलताना सांगितले.

आज भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, संजय सातार्डेकर, वैभव इनामदार यांनी भेट दिली. आम्ही तुमचे म्हणणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पर्यंत पोहोचवतो असे त्यांनी आश्वासन दिले.