सांगली : पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात ख्याती असलेल्या खरसुंडीच्या सिद्धनाथाच्या चैत्री यात्रेत माणदेशी खिलार जनावरे बाजारात सात कोटींची उलाढाल झाली. चार दिवसांच्या बाजारात या वर्षी १२ हजार जनावरांची आवक झाली असल्याची माहिती आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी शनिवारी दिली.दर वर्षी नाथबाबांच्या चैत्री यात्रेच्या निमित्ताने खरसुंडी (ता. आटपाडी) येथे चार दिवस जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती व खरसुंडी ग्रामपंचायतीच्या वतीने यंदा घाणंद-चिंचोळी रस्त्यावर हा बाजार भरविण्यात आला होता.

यंदाच्या बाजारात खिलार जातीच्या खोंडांना चांगली मागणी होती. माळरानावरील चाऱ्यावर जगणाऱ्या खिलार बैलाची जात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनती व काटक समजली जाते. तसेच शर्यतीसाठी अधिकाधिक वेगवान पळणारी बैलाची जात मानली जात असल्याने आणि दिसायला कोशा रंगाची व ताकदवान असली, तरी शरीरयष्टी सुडौल असल्याने मागणीही चांगली असते. यंदाच्या बाजारात चाळीस हजारांपासून दोन लाखांपर्यंत खिलार खोंडांचे दर होते. यात्रेमध्ये जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून ७ कोटींची उलाढाल झाली आहे.

यात्रेमध्ये बाजार समितीने शेतकरी, व्यापारी व जनावरांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरद्वारे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यात आला होता. तसेच, रात्री उजेडासाठी विजेची व्यवस्था करण्यात आली होती. जनावरे चोरीच्या घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणाही यात्रेच्या ठिकाणी उभारण्यात आली होती. वाहनतळासाठीही उपबाजार आवारात सोय केली होती. जनावरांच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय पथक उपलब्ध ठेवण्यात आले होते. बाजार समितीचे उपसभापती शंकर भिसे, सचिव, कर्मचारी यांनी वेळोवेळी पाहणी करून यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली.

बाजार समितीने जनावरे बाजारात, तर ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेकरूंसाठी सरपंच धोंडीराम इंगवले यांनी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली होती.