अमरावतीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या ९ सप्टेंबरला निवडणूक होत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावेळी झालेल्या सत्ता सहभागातील करारानुसार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘डाव’ असला तरी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या खोडके गटाकडे १६ नगरसेवक असल्याने काँग्रेसला या गटासोबतच आघाडी करणे अपरिहार्य झाले आहे. आगामी महापौर हा खोडके गटाचा असेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. खोडके गटाने महापौरपदासाठी रिना नंदा आणि काँग्रेसने उपमहापौरपदासाठी शेख जफर शेख जब्बार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.
काँग्रेसने मंगळवारी आघाडीच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन खोडके गटाला महापौरपद आणि काँग्रेसकडे उपमहापौरपद ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला बहुतांश नगरसेवकांनी मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले. राज्यात काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडी आहे. गेल्यावेळी हीच आघाडी महापालिकेत सत्तेत होती, पण लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर खोडके समर्थक नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी संबंध तोडले. आता खोडके गटाच्या सहकार्याशिवाय सत्ता स्थापन करणे अवघड असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले, पण आघाडीधर्म निभावायचा की खोडके गटाच्या सहकार्याने सत्ता हस्तगत करायची या द्विधा मन:स्थितीत काँग्रेसचे स्थानिक नेते सापडले होते, पण गेल्या काही दिवसांतील घडामोडींमध्ये वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर काँग्रेसने खोडके गटाला सहकार्य करायचा निर्णय घेतल्याचे कळते.
महापालिकेत काँग्रेस आघाडीचे २९ तर खोडके गटाचे १६ असे संख्याबळ आहे. त्यात काँग्रेसच्या २४ नगरसेवकांसह समाजवादी पक्षाचे १, मुस्लिम लीग २ आणि २ अपक्षांचा समावेश आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ४४ ची संख्या गाठणे आवश्यक आहे. अशा स्थितीत ही आघाडी सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत. महापालिकेत खोडके गट वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य आहेत. शिवसेनेचे ११, भाजप ७ आणि अपक्ष २ अशी भाजप-सेना आघाडी आहे. जनविकास-रिपाइं ९, बसप ७ अशी संख्या आहे. खोडके गटाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य धावपळ करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शक्ती उभी केली असली, तरी हा गट कितपत उपद्रवमूल्य दाखवू शकतो, याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. यावेळी महापौरपद खुल्या संवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदावरून उफाळून आलेल्या संघर्षांत उच्च न्यायालयाने अविनाश मार्डीकर यांना गटनेतेपदी कायम ठेवून खोडके गटाला दिलासा मिळवून दिला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी चालवली आहे.
खोडके गटाचे महापालिकेतील वर्चस्व मोडून काढण्यासाठी रवी राणा यांचा गट पुढे सरसावला असला, तरी कमी संख्याबळ ही या गटाची कमजोरी बनली आहे. काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक संख्याबळ असलेल्या खोडके गटाशी संवाद साधणे पसंत केल्याने राष्ट्रवादी वर्तुळात निराशेचे वातावरण आहे. महापौरपदाच्या निवडणुकांमध्ये अनेकवेळा कलाटणी अनुभवण्यास मिळालेली असल्याने खोडके गट देखील यावेळी सावधपणे हालचाली करीत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने गटापासून दूर झालेल्या राष्ट्रवादीतील काही सदस्यांना जवळ करण्याची तयारी खोडके गटाने दाखवलेली आहे, पण त्याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होणार.
अमरावतीच्या महापौरपदासाठी खोडके गटाची मोर्चेबांधणी
अमरावतीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या ९ सप्टेंबरला निवडणूक होत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावेळी झालेल्या सत्ता सहभागातील करारानुसार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘डाव’ असला तरी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या खोडके गटाकडे १६ नगरसेवक असल्याने काँग्रेसला या गटासोबतच आघाडी करणे अपरिहार्य झाले आहे.
First published on: 04-09-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khodke group setting strategies for amravati mayoral elections