लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : वाहन कर्जाचे हप्ते न भरल्याने एका खासगी बँकेच्या कर्जवसुली एजंटांनी संबंधित कर्जदाराच्या तरुण मुलाचे अपहरण केले. त्याच्या ताब्यातील मोटार काढून घेतली आणि तरुणाला एका गोदामात डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हा अपहरणाचा प्रकार शहरातील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून, संबंधित कर्जदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, शकील बोंडे, इम्रान शेख आणि देवा जाधव अशा तिघा जणांविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एखाद्या कर्जदाराने बँकेच्या कर्जाचे हप्ते थकविल्यास बँकेकडून त्या कर्जदाराची गहाण ठेवलेली आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त केली जाते. ही अशी कायदेशीर कारवाई नेहमीच होते. परंतु कर्जदाराने कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे संबंधित कर्जदाराच्या मुलाचेच अपहरण करण्यापर्यंत बँकेची मजल गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील पीडित कर्जदार व्यक्तीने एका खासगी बँकेकडून मोटार खरेदीसाठी वाहन कर्ज घेतले होते. अलीकडे काही महिन्यांपासून कर्जाचे हप्ते थकीत राहिल्याने बँकेच्या कर्जवसुली पथकाने संबंधित कर्जदाराकडे तगादा लावला होता. त्यातूनच या पथकातील तिघा एजंटांनी कर्जदाराच्या तरुण मुलाचे चक्क अपहरण केले. त्या वेळी कर्जदाराची मोटार त्याचा मुलगा चालवत होता. कर्जवसुली पथकातील एजंटांनी मोटार ताब्यात घेऊन मुलाचे अपहरण करून त्यास एका गोदामात डांबून ठेवले. हा प्रकार लक्षात येताच संबंधित कर्जदाराने कर्जवसुली पथकाकडे धाव घेतली असता, मुलाच्या मुक्ततेसाठी त्यांना दहा हजार रुपयांची खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटल्याचे पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी सांगितले.