पतीपासून विभक्त राहणा-या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी स्थानिक तरुणासह तिघांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीला अमली पदार्थाच्या विक्री जाळय़ात ओढण्याचाही प्रयत्न झाला होता.
गेल्या दि. २५ जुलै रोजी जवळे येथील पोपट सालके याने एका तरुणीस लग्न करतो, अशी फूस लावून पुणे येथे पळवून नेले. या तरुणीचा आधी विवाह झाला होता. मात्र पतीशी न पटल्याने ती माहेरीच राहात होती. तिच्याशी जवळीक साधून पोपट सालके याने त्या संधीचा फायदा घेत त्या तरुणीला दुसरे लग्न करण्याची गळ घातली. तरुणी व तिची आई लग्नासाठी तयार झाल्यानंतर पोपट त्या तरुणीला पुणे येथे घेऊन गेला.
पुणे येथे पोपट याने त्या तरुणीची बादशाह नावाच्या इसमाशी ओळख करून दिली. बादशाह याच्याशी ओळख करून देण्यासाठी वाघोली येथील भामाबाई या महिलेची मदत घेण्यात आली. तरुणीस बादशाह याच्याकडे सोपवून तिच्या बदल्यात २५ हजार घेऊन पोपट जवळे येथे परतला. दरम्यानच्या काळात बादशाह याच्याकडे अशीच एक मुलगी दाखल झाली. या दोघींच्या मदतीने कर्नाटकात अमली पदार्थ विक्री करण्याचा बादशाह याचा डाव होता. तरुणींच्या हातातील अंगठीमध्ये अमली पदार्थ दडवून ते विकण्याचे प्रशिक्षणही दोन्ही तरुणींना देण्यात येत होते. फसवले गेल्याचे लक्षात येताच बादशाह बाहेर गेल्याची संधी साधून पीडित तरुणीने वाघोली येथील खोलीतून पळ काढला. तेथून पुण्यात जाऊन पुढे अन्यत्र नातेवाइकांकडे ती गेली. त्यांना झालेला प्रकार सांगितल्यानंतर तेथील पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देऊन या तरुणीला तिच्या आई-वडिलांकडे जवळे येथे पोहोचवण्यात आले.
पीडित तरुणीने आईला सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर मुलीच्या आईने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी पोपट जयराम सालके, बादशाह व भामाबाई यांच्या विरुद्ध तरुणीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा