किनवट पोलिसांच्या अमानुष वागणुकीला घाबरून मंगळवारी पोलीस ठाण्यातच युवकाने जाळून घेतले. त्याला तातडीने तेलंगणातील आदिलाबाद येथे हलविण्यात आले; परंतु तो ९० टक्के भाजला असल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी त्याचे पार्थिव किनवटमध्ये आणल्यानंतर पावणेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित फौजदारास निलंबित करण्याचे पोलीस अधीक्षकांनी जाहीर करताना प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे सोपविण्यात आल्याचे स्पष्ट केले.
चोरीच्या प्रकरणात संशयित म्हणून हवा असलेल्या संजय पिराजी धोत्रे (वय २२, गंगानगर) या युवकाला ताब्यात घेताना पोलिसांनी आततायीपणा केला, त्यामुळे मंगळवारी किनवटला तणावाचे वातावरण निर्माण झाले. संजय सापडला नाही, म्हणून पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना ठाण्यात नेले. या वेळी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही माहिती मिळताच संजय धोत्रे याने पोलीस ठाणे गाठले व भेदरलेल्या अवस्थेत काही कळायच्या आत भरदुपारी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्याला तातडीने आदिलाबाद येथे उपचारार्थ नेण्यात आले; पण त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, स्वत:ला जाळून घेण्यापूर्वीच त्याने निवेदन लिहून ठेवले होते. त्यात पोलिसांनी किती अमानुषपणे त्याचे कुटुंबीय व नातेवाइकाला मारहाण केली, याचे वर्णन असल्याची चर्चा आहे.
अचानक उद्भवलेल्या या प्रकरणामुळे मंगळवारी किनवट शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर शहराला छावणीचे स्वरूप आले. प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अतिरिक्त अधीक्षक श्याम घुगे किनवटमध्ये तळ ठोकून आहेत. बुधवारी सकाळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दहिया यांची भेट घेतली. माजी खासदार डी. बी. पाटील, आमदार प्रदीप नाईक यांनी फौजदार व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या प्रकरणी मंगळवारी रात्रीच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित फौजदार विवेकानंद भारती यांना निलंबित केल्याचे अधीक्षक दहिया यांनी स्पष्ट केले. शिवाय या प्रकरणाच्या तपासाबाबत शंकेला वाव राहू नये, या साठी सी.आय.डी.कडे तपास सोपविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा