जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणात शनिवारपासून माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी याही सहभागी होणार आहेत. त्यांनीच बुधवारी राळेगणसिद्धी येथे ही माहिती दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याची पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांची घोषणाही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.  
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बेदी यांनी राळेगणसिद्घी येथे येऊन हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. सरकारने राज्यसभेत व लोकसभेत जनलोकपाल विधेयक मंजूर करावे, तसे न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला मतदान करू नये असे आवाहन बेदी यांनी केले. त्या म्हणाल्या, सरकारने जनलोकपाल विधेयक विरोधकांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह राज्यसभेत व लोकसभेत मंजूर करावे तसे केल्यास सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत केलेली सर्व पापे धुतली जातील.
बेदी म्हणाल्या, जनलोकपाल विधेयकासाठी हजारे सतत तीन वर्षे संघर्ष करीत आहेत, मात्र सरकार दाद तर देत नाहीच, मात्र खोटी आश्वासने दिली जातात. जनलोकपाल विधेयक संमत झाल्यावर देशातील भ्रष्टाचाराला मोठय़ा प्रमाणावर आळा बसेल व सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातून कररूपाने जमा होणाऱ्या पैशातून विविध विकास योजना राबविता येतील. हे विधेयक मंजूर होणे हे देशातील प्रत्येकाच्या हिताचे आहे ते सरकारने तातडीने मंजूर करावे, अन्यथा देशातील जनता सरकारला माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
दुपारी दोन वाजता बेदी राळेगणसिद्घीत पोहोचल्या. संत यादवबाबा मंदिरातील बंद खोलीत हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पर्यावरणवादी नेते विश्वंभर चौधरी हे त्यांच्या समवेत होते. येत्या शनिवारपासून हजारे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचे बेदी यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा