जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अर्जुन खोतकर यांनी मंगरूळ येथील किरण खरात यांची सुपारी दिली, असा आरोप गोरंट्याल यांनी केला. तसेच अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटातील काहीजणांना चरबी चढली आहे. खोतकर आणि झोल कुटुंबीयांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील किरण खरात यांची सुपारी दिली आहे. जालन्याचा बिहार करायची तयारी खोतकरांची तयारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून मोक्का लावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं कैलास गोरंटयाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
हेही वाचा- पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार? ठाकरे गटाकडून खुली ऑफर
क्रिप्टो करन्सी आणि आर्थिक देवाणघेवाणीतून जालन्यातील मंगरूळ येथील किरण खरात यांना मारहाण करण्यात आली. गजानन तौर यांच्यासह आणखी काही गुंडानी त्यांचं अपहरण करून त्यांचा छळ केला. त्यामुळे पोलिसांनी विजय झोल यांच्यासह अपहरण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली.
हेही वाचा- “अजित पवारांची ‘ती’ इच्छा लवकरच पूर्ण होईल”, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांचं विधान
दोन दिवसानंतर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असून अर्जुन खोतकर हा तुमच्या नावाने जालन्यात नंगानाच करून लोकांना त्रास देत आहे, अशी तक्रार करणार असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलं. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असून व्यवहारात फायदा झाला की मजा करायची आणि तोटा झाला की लोकांना मारायचं, हे योग्य नाही, असंही गोरंट्याल म्हणाले. किरण खरात याचं दोन वेळा अपहरण करण्यात आलं असून पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचे दोन गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी केली. आरोपींनी किरण खरात यांच्या घरी जाऊन केलेल्या छळाचे व्हिडीओही गोरंट्याल यांनी पत्रकारांना दिले.