अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. या बंडखोरीमुळे आता पक्षात दोन गट पडले आहेत. पक्षातले बहुतांश आमदार अजित पवार यांच्याबरोबर आहेत. तर काही मोजके आमदार शरद पवार यांच्याबरोबर आहेत. दरम्यान, या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. काही आमदार नेमके कोणत्या गटात आहेत, ते समजू शकलेलं नाही. यात एक नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं, ते म्हणजे अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांचं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार किरण लहामटे हे अजित पवार यांच्या शपथविधीला हजर होते. त्यामुळे सर्वांना वाटलं होतं की, ते अजित पवारांबरोबर आहेत. परंतु त्याच दिवशी त्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि आपण तटस्थ असल्याचं सांगितलं. त्यावेळी किरण लहामटे म्हणाले, मी मतदार संघात जाऊन याबाबतचा निर्णय घेईन. त्यानंतर किरण लहामटे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. लहामटे यांनी आपण अजित पवार यांच्याबरोबर असल्याचं जाहीर केलं आहे.

किरण लहामटे यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेऊन अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीने लहामटे यांच्याशी बताचित केली. यावेळी आमदार लहामटे यांना विचारण्यात आलं की, असं काय घडलं की तुमच्यावर तिसऱ्यांदा यू टर्न घ्यायची वेळ आली? त्यावर लहामटे म्हणाले, मी सुरुवातीला अजित पवार यांच्या शपथविधीला हजर होतो. मला अजितदादांनी सांगितलं होतं, त्यामुळे मी तिथे गेलो होतो. मला नुकतीच त्याविषयीची माहिती मिळाली होती. त्यानंतर मी माझ्या मतदारसंघात जाऊन निर्णय घ्यायचं ठरवलं. मला मतदारसंघातील काही जणांनी भावनिक साद घातली आणि म्हणाले, आपण शरद पवार यांच्याबरोबर गेलं पाहिजे. तर काहींचं म्हणणं होतं विकासासाठी आपण अजित पवारांबरोबर गेलं पाहिजे.

हे ही वाचा >> राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीने…”

आमदार किरण लहामटे म्हणाले, मतदारसंघातील बरेच जण मला म्हणाले, तुम्हाला घ्यायचा तो निर्णय तुम्ही घ्या, परंतु तुमची फसवणूक होता कामा नये. मीसुद्धा भावनिक झालो होतो. त्यामुळे मग मी शरद पवार यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला. परंतु मतदारसंघातील लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. विकासासंबंधी अनेक मागण्या होत्या. चांगले रस्ते हवेत, आमच्या बसस्थानकाला कुत्सिततपणे ‘कसलं भारी बस स्थानक आहे’, असं म्हटलं जातं. तिथे चांगलं बसस्थानक हवं आहे. कारखान्याचा रस्ता करायचा आहे. अशी अनेक विकासकामं करायची आहेत. मतदारसंघात विकास झाला पाहिजे, विकासासाठी निधी आला पाहिजे. म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि मतदारसंघातील लोकांच्या आग्रहास्तव अजित पवार यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran lahamate says joined ajit pawar for development in my constituency asc