Kiran Mane Facebook Post for Uddhav Thackeray : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (२७) जुलै ६४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांना शिवसेनेतील नेते, पदाधिकारी, आमदार व खासदारांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविकास आघाडीमधील त्यांच्या सहकाऱ्यांकडूनही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा मिळाल्या. दरम्यान, शिवसेनेतील (उबाठा गट) सदस्य व अभिनेते किरण माने यांनी एक दिवस उशिरा उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. माने यांनी काही वेळापूर्वी समाजमाध्यमांवर त्यांची एक जुनी पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माने यांनी म्हटलं आहे, “ही दोन वर्षांपूर्वीच्या त्या दिवशीची पोस्ट आहे ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी गद्दारांचे घाव झेलून हसतमुखाने राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला होता. उद्धव ठाकरेंसाठी एकच शब्द आहे, तो म्हणजे ग्रेसफुल”.

किरण माने यांनी म्हटलं आहे, “एक सत्यघटना सांगतो. सातार्‍याजवळ खिंडवाडी नांवाचं एक छोटं गाव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव लय छोटं. त्यात गांवापास्नं लांब शेतात एकाकी असलेलं घर. लय दिवसांनी जमिनीवर मांडी ठोकून जेवायला बसलो आणि ‘ती’ बातमी दिसली. कुणाचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही राजीनामा दिलेला पाहून त्या घरातला एकेक माणूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजणांच्या डोळ्यांत पाणी आलं. घरातल्या तरण्या लोकांपास्नं म्हातार्‍यांपर्यंय प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं, चांगला माणूस होता.”

उद्धव ठाकरे यांना उद्देशून माने म्हणाले, “खरं सांगू? तुमच्या आयुष्यात जे घडलं, राजकारणात ती ‘कॉमन’ गोष्ट आहे. खर्‍या आयुष्यात गरीब, श्रीमंत, सामान्य माणूस, सेलिब्रिटी सर्वांना विश्वासघाताचं दु:ख पचवावं लागतं. पण अशावेळी खूप कमी लोक तुमच्यासारखे ‘धीरोदात्त’ असतात! जे घडलं ते ‘माणूस’ म्हणून उद्ध्वस्त करणारं होतं. तुम्ही आतून ‘तुटला’ नसाल का हो? जी माणसं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आणली, त्या माणसांबरोबरचे कित्येक सुख-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का?”

kiran mane reaction on when he removed from serial
किरण माने

आता १०० टक्के शुद्ध लोक तुमच्याबरोबर : किरण माने

किरण माने म्हणाले, “कोणी म्हणेल, हे राजकारणी लोक लय पोचलेले असतात. सगळे सारखेच. हे ही मान्य. तरीही मी फक्त माणूस म्हणून विचार करतोय. मी स्वत: यातून गेलोय. जवळच्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर वेदना होतातच. काळीज तुटतंच. तरीही संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता शांतपणे पद सोडलंत! सहजासहजी कुणाला मिळणार नाही, आज एकाही नेत्याकडं नसेल अशी एक गोष्ट आता तुमच्याकडं आहे. आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध – स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के ‘प्युअर’ असलेला एकेक माणूस तुमच्याबरोबर आहे!”

किरण माने उद्धव ठाकरेंना म्हणाले, “तुम्हाला राखेतून झेप घ्यायची आहे. शून्यातून विश्व उभं करायचं आहे. हे लिहिणारा मी ना शिवसैनिक, ना राजकारणी. तुम्ही आयुष्यात कुठली मदतही मला केलेली नाही आणि मी ती अपेक्षाही कधी ठेवली नाही. तरीही मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची ‘ॲचिव्हमेन्ट’ (यश) आहे! लव्ह यू उद्धवजी.”

मानेंकडून एक दिवस उशिराने शुभेच्छा

या पोस्टच्या शेवटी माने यांनी लिहिलं आहे की “उद्धवजी, आज मी शिवसैनिक आहे. थेट मातोश्रीवर बोलावून तुम्ही मला शिवबंधन बांधलंत. आता कळतंय, बाहेरून तुम्ही जसे वाटत होतात, तसेच आतूनही आहात. नितळ, निर्मळ आणि संवेदनशील. एक दिवस उशीरा का होईना, पण तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.”

Story img Loader