Kiran Samant on Rajan Salvi : “मला खासदारकी (लोकसभेची निवडणूक) लढवायची होती”, असं वक्तव्य राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केलं आहे. किरण सामंत म्हणाले, “मला राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन देखील मिळालं होतं. मात्र मी लोकसभेवर ठाम होतो”. राजापूरातील एका कार्यक्रमात किरण सामंत बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले, “रत्नागिरीमधील भविष्यातील निवडणुका या राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आहेत”. माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेला (ठाकरे) जय महाराष्ट्र करत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. पक्षांतरानंतर ते पहिल्यांदाच राजापूरमधील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी येथील विद्यमान आमदार किरण सामंत देखील मंचावर उपस्थित होते. सामंत यांनी साळवी यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच ते म्हणाले, “मी खासदार, उदय सामंत रत्नागिरीचे आमदार आणि तुम्ही (राजन साळवी) राजापूरचे आमदार ठरलं होतं. मात्र साळवी यांनी त्यावेळी निर्णय घेतला नाही. हरकत नाही, आता एकत्र मिळून मतदारसंघाचा विकास करू”.
किरण सामंत म्हणाले, “आम्ही (शिंदेंची शिवसेना) त्यावेळी राजन साळवी यांना म्हटलं होतं की साथ द्या. परंतु, ते त्यावेळी ऐकले नाहीत. मला लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्याचबरोबर मला राज्यसभेबाबतही आश्वासन देण्यात आलं होतं. पण ते जाऊ द्या, झालं ते झालं. आता आम्ही आमदार आहोत. तुम्ही सर्वजण आमदार आहात. आपण सर्वजण मिळून आपल्या मतदारसंघाचा विकास करू”.
एकनाथ शिंदेंचा सामंत बंधूंना शह?
माजी आमदार राजन साळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश निश्चित मानला जात होता. त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील झाल्या होत्या. केवळ पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी होती. मात्र भाजपामध्ये प्रवेश करण्याऐवजी राजन साळवी शिवसेनेत (शिंदे) दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. किरण सामंत यांच्याविरोधात राजापूरची विधानसभा निवडणूक लढवणारे साळवी अचानक शिंदे गटात का दाखल झाले याबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी साळवी यांना पक्षात घेऊन रत्नागिरीमधील उदय सामंतांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशा स्थितीत पक्षात सारं काही आलबेल आहे असा संदेश देण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी आज राजापुरात राजन साळवी यांचं स्वागत केलं. तसेच आगामी काळात पक्षासाठी एकत्र काम करण्याची भूमिका जाहीर केली.