Kirit Somaiya vs Shivsena : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले. तर सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहचताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि यानंतर, भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजुंनी मोठी घोषणाबाजी झाली. ग्रामपंचायत परिसरात मोठ्याप्रमाणावर पोलीस दाखल आहेत.
कोर्लई ग्रामपंचायतीस भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोसीस स्टेशन गाठून, १९ बंगल्यांच्या तपासाबद्दल अर्ज दिला आहे.
कोर्लई ग्रामपंचायत कार्यालायात आमची व्यवस्थित चर्चा आणि ग्रामसेवकांशी भेट झाली. पुण्यासारखा प्रकार इथे झाला नाही. पुण्यात तर उद्धव ठाकरेंनी गुंडांना पाठवलं होतं. लाठी-काठी आणि दगड घेऊन. इथे स्वाभाविक आहे सत्तेसाठी सत्तेपोटी तो सरपंच सकाळी म्हणतो बंगले आहेत आणि दुपारी सांगतो बंगले गायब झाले.
मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी सरंपंच, शिवसेना कार्यकर्ते म्हणतात बंगले नाहीत, म्हणून पोलीस स्टेशनला यावं लागलं. कारण, बंगले नाहीत हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणत आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणत आहेत की माझे बंगले आहेत. तरी याबाबत चौकशी व्हायला हवी. खरं कोण आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री खरे आहेत की मिसेस मुख्यमंत्री खऱ्या आहेत याची स्पष्टता ग्रामपंचायत करू शकली नाही.
कोर्लई गावाला निघण्याआधी किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना, त्यांनी कोर्लईच्या जमिनीवर घरं आहेत की नाहीत याबाबत ठाकरे परिवारानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली होती. तसेच, महाराष्ट्रातील जनतेला वास्तव कळावं यासाठी आपण जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ''मी मुख्यमंत्री असताना माझे १९ बंगले चोरीला गेले. माझ्या पत्नीचे १९ बंगले मी सांभाळू शकलो नाही असं मुख्यमंत्र्यांनी कबूल करावं.'' महाराष्ट्रातील जनता माफ करेल असंही ते म्हणाले होते.
कोर्लई ग्रामपंचायतीस भेट दिल्यानंतर आणि संरपंच व उपसरपंच यांच्याशी दहा मिनिटं चर्चा केल्यानंतर, किरीट सोमय्या हे अलिबागच्या दिशेने निघाले.
किरीट सोमय्या यांच्याकडून गावाला बदनामा करण्याचा प्रयत्न होत आहे. अशी टीका कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी कोलई गावातील ग्रामपंचायतीस भेट दिली. तिथे ते जवळपास दहा ते पंधरा मिनिटं होतं. यानंतर ते कार्यालयातून बाहेर पडून आपल्या ताफ्यासह पुढे मार्गस्थ झाले.
किरीट सोमय्या येणार म्हणून पोलीस प्रशासनाकडू विशेष खबरदारी म्हणून गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.