छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर भाजपने आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. तटकरे यांची कोंडी करण्यासाठी आक्रमक झालेल्या भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तटकरे तसेच त्यांच्या कुटुंबीयाविरोधात पदाचा गैरवापर करणे, बोगस कंपन्यांच्या नावाने जमिनी खरेदी-विक्री करणे, सिंचन घोटाळ्यातील पैसा कुटुंबीयांशी निगडीत कंपन्यांकडे वळवणे याबाबतचे पुरावे सादर केले.
तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बोगस कंपन्या स्थापन केल्या. या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागात शेतजमिनी खरेदी केल्या. शेतकऱ्याकडून कवडी मोलाने खरेदी केलेल्या या जमिनी नंतर चढ्या दराने दुसऱ्या कंपन्यांना विकल्या, जमिनी खरेदी विक्रीच्या या व्यवहारामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांनी सहकार्य केले, असा आरोप सोमय्या यांनी केला. सिंचन घोटाळ्याशी संबधित असलेल्या एफ ए कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खात्यातील ८०० कोटी रुपयांची रक्कम तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयाशी निगडीत खात्यामध्ये वळते झाले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर येत्या सोमवारी दिल्ली येथील सक्तवसुली संचालनालयात जाऊन तटकरे आणि अजित पवार यांच्याविरोधात पुरावे सादर करणार असून मंगळवारी याच प्रकरणाच्या चौकशीला गती देण्यासाठी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सागितले. तटकरे यांनी गुंडाकरवी आपल्या कुटुंबीयांना धमकावण्याचे प्रकार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील तटकरे यांच्या मालमत्तांची येत्या १५ दिवसांत स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सोमय्यांचे आरोप तटकरेंनी फेटाळले
किरीट सोमय्या यांनी सुनील तटकरे यांनी गुंड पाठवून आपल्या कुटुंबीयांना धमकावल्याचा गंभीर आरोप अलिबाग येथे आयोजित पत्रकार परीषदेत केला होता, मात्र सोमय्या यांचा हा आरोप तटकरे यांनी फेटळला आहे.
वैयक्तिक अथवा सार्वजनिक आयुष्यात मी कधी मारामारी केली नाही. त्यामुळे गुंड पाठवून कोणाला धमकावण्याचा प्रश्नच उदभवत नाही. राजकारणात काम करताना असे प्रकार आजवर केलेले नाही आणि करणारही नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले
माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर झालेल्या आरोपांची गेली तीन वर्षे चौकशी सुरु आहे. या चौकशीला सामोरे जाताना मी सर्वतोपरी सहकार्य केले आहे आणि यापुढील काळातही सर्व चौकशांना सामोरे जाण्याची माझी तयारी आहे आणि संबधित यंत्रणांना लागणारे सर्व सहकार्य केले जाईल. या चौकशीनंतर सत्य समोर येईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
सुनील तटकरेंविरोधात किरीट सोमय्या आक्रमक, कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप
तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बोगस कंपन्या स्थापन केल्याचा आरोप
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-03-2016 at 18:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya aggressive over sunil tatkare in irrigation scam