कोर्लईच्या सरपंचांचे स्पष्टीकरण
अलिबाग: कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेवर १८ बंगले अस्तित्वात नाहीत. भाजप नेते किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.
कोर्लई येथील मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या जागेवर १९ बंगले अस्तित्वात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे आरोप खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले होते. या जागेवर बंगले दिसले तर राजकारण सोडीन अस असे स्पष्ट केले होते. यानंतर आज पुन्हा सोमय्यांनी कागदपत्रांचा दाखला देत या ठिकाणी बंगले असल्याचा दावा केला होता.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत ९ एकर जागा ही अन्वय नाईक यांच्या नावावर होती. या जागेवर त्यांनी २००९ मध्ये रिसॉर्ट उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यावेळी या ठिकाणी कच्ची बांधकामे करण्यात आली होती. मात्र सीआरझेड कायद्यामुळे आवश्यक बांधकाम परवानगी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी रिसॉर्ट बांधकामाचा निर्णय रद्द केला. कच्ची बांधकामे पाडून त्या ठिकाणी फळझाडांची लागवड केली. यानंतर ही जागा २०१४ मध्ये त्यांनी मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांना विकली. त्यांनीही जागा घेतल्यावर या ठिकाणी कुठलीही बांधकामे केली नाहीत, आज या जागेवर १८ बंगले अस्तित्वात नाही, असे कोर्लईचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.
अन्वय नाईक यांनी केलेल्या कच्च्या बांधकामांची ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून घरपट्टी वसूल केली जात होती. मात्र सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर ग्रामंपचायतीने तसेच प्रशासकीय यंत्रणांनी या जागेची प्रत्यक्ष पाहाणी केली. या ठिकाणी कुठलेही बंगले अथवा घरांची बांधकामे आढळून आली नाही. त्यानंतर आता या अस्तित्वात नसलेल्या १८ घरांची नोदंणी काढून टाकण्यात आली असल्याचेही सरपंच मिसाळ यांनी स्पष्ट केले.