राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली होती. यातील दोन नेते तुरुंगात असल्याचं सांगत उर्वरित १० नेते तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बरेच दिवस शांत राहिल्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केलंय. त्यांच्या या ट्वीटने खळबळ उडाली आहे.
‘चला दापोली, २६ मार्चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया,’ असं सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. त्यामुळे सोमय्या २६ मार्चला दापोलीला जाणार असल्याचं निश्चित झालंय. गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या सातत्याने अनिल परबांवर आरोप करत आहेत.
दापोली संदर्भातील ट्वीटपूर्वी सोमय्या यांनी आणखी एक ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले होते. “श्री अनिल परब, रिसॉर्टच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये रोख स्वरूपात खर्च झाल्याचे आयकर विभाग सांगत आहेत, ही रोख रक्कम कुठून आली? ही वसुली वाझेंची होती की खरमाटेची?,” असे प्रश्न त्यांनी विचारले होते.
अनिल परब यांचं हे रिसॉर्ट बेनामी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. दरम्यान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर किरीट सोमय्यांचा रोख अनिल परब यांच्याकडे असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या ट्वीटला अनिल परबांकडून काय प्रत्युत्तर येतंय आणि २६ मार्चला ते खरंच परबांचे रिसॉर्ट तोडणार का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.