भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. यावेळेस सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासंदर्भातील प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान देताना शिवसेनेच्या या आमदाराविरोधात आपल्याकडे केंद्रीय गृह मंत्रालयाचा अहवाल आल्याचं सोमय्या म्हणालेत.
काय आहे प्रकरण?
अशी माहिती समोर आलीय की तुमचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यासंदर्भातील एक अहवाल समोर आलाय. त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी तुम्ही एक पत्र देखील महाराष्ट्र सरकारला लिहीत आहात, यासंदर्भात काय माहिती द्याल, असं पत्रकारांनी सोमय्यांना विचारलं असता त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. “माहिती अधिकाराखाली प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलो असताना फोटो व्हायरल झाले,” असं सोमय्या म्हणालेत.
प्रताप सरनाईक यांनी फोटो काढले
पुढे बोलताना, “माझ्या सुरक्षेशी उद्धव ठाकरे सरकारने छेडछाड केली. त्याच्या चौकशीचे आदेश भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिले होते,” अशी माहिती समोय्यांनी दिली. तसेच यापैकी एक अहवाल आपल्याकडे आल्याचंही सोमय्यांनी स्पष्ट केलं. “आता भारत सरकारच्या गृहमंत्री सुरक्षा विभागाचा अहवाल माझ्याकडे आलाय. त्यात त्यांनी लिहिलं आहे की प्रताप सरनाईकने फोटो काढले होते,” असं अहवालात असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> “मी थोतांड उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कालच मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले की…”; सोमय्यांचा गंभीर आरोप
आता माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे
याच अहवालाच्या आधारे सोमय्यांनी, “आता माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, मुख्यमंत्री मोहोदयजी आपण त्या दिवशी आदेश दिले होते की किरीट सोमय्यावर गुन्हा दाखल करा. आता प्रताप सरनाईकवर गुन्हा केव्हा दाखल करणार?,” असं म्हटलंय.
जेलमध्ये जायला तयार
“गेल्या आठ दिवसात संजय राऊत यांनी चार वेगवेगळे आरोप केले परंतु त्यांनी एकही कागद दाखविला नाही. त्यानंतर जेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे थोतांड उघडकीस आणले त्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले की किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा. त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत,” असं सोमय्या म्हणाले आहेत.