भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. कोर्लई गावात ठाकरे कुटुंबाच्या मालकीचे १९ बंगले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. संबंधित बंगले पाहण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लई गावातही गेले होते. पण संबंधित कागदपत्रांमध्ये उल्लेख असलेल्या जमिनीवर एकही बंगला आढळला नाही. यानंतर किरीट सोमय्यांनी कोर्लई ग्रामपंचायतीवर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आणि मूळ फाइल गायब केल्याचा आरोप केला. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला.
या सर्व घडामोडीनंतर किरीट सोमय्यांनी मोठा दावा केला आहे. कोर्लई गावातील १९ बंगल्यांबाबतची गायब झाल्याची फाइल आपल्याला सापडली आहे, असा दावा सोमय्या यांनी केला. तसेच उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन गायब झालेल्या फाइलमधील तथ्य उघड करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. त्यामुळे उद्या ठाकरे कुटुंबाचा कथित घोटाळा उघड होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एक व्हिडीओ जारी करत किरीट सोमय्या म्हणाले, “ठाकरे कुटुंबाची १९ बंगल्यांबाबतची गायब झालेली फाइल आता मला सापडली आहे. ही फाइल ८० पानांची आहे. या गायब झालेल्या फाइलमधील गोष्ट मी उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत सांगणार आहे.”
नेमकं प्रकरण काय?
२०१४ साली रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी कै. अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथील जागा त्यावरील बांधकांमासह विकत घेतली होती. या जागेवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. कै. अन्वय नाईक हे या घरांची घरपट्टी भरत होते. हे बंगले ठाकरे – वायकर यांच्या नावे करावेत यासाठी पाठपुरावादेखील करण्यात आला. ही घरे ठाकरे – वायकर यांच्या नावे देखील झाली होती. त्यांची घरपट्टीही ते भरत होते. नंतर मात्र हे प्रकरण अडचणीचे ठरू शकते, हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून २०२२ मध्ये कागदपत्रामंध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या घरांची नोंदणी रद्द करून घेतली आणि बंगले जमिनदोस्त केले असा आरोप डॉ. किरीट सोमय्या यांनी केला होता.