राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील अपक्ष आमदारांचे वजन चांगलेच वाढले आहे. शिवसेना आणि भाजपाकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा या निवडणुकीत ‘घोडेबाजार’ करेल, असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. याबाबत आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी केली आहे. सोमय्या नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यसभा निवडणुकीत राज्यातून भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून येणे शक्य आहे. मात्र, भाजपाने तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने अपक्ष आमदारांशी जवळीक साधणे सुरू केले आहे. भाजपा राज्यसभा निवडणुकीत ‘घोडेबाजार’ करेल, म्हणजेच अपक्ष आमदारांना पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप शिवसेना नेते करीत आहे.
“घोडेबाजार म्हणणे थांबवा अन्यथा…”; अपक्ष आमदार जोरगेवार यांचा शिवसेनेला इशारा
“निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो करणारा, पाहणारा आणि होऊ देणारा हे सर्व जबाबदार आहेत. म्हणून आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या प्रवक्त्यांचा ताबडतोब जबाब नोंदवण्यात यावा. घोडेबाजार करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी,” असे किरीट सोमय्या म्हणाले.
“स्वतःच्या पक्षाचे, मित्रपक्षांचे आणि त्यांना समर्थन देणारे आमदार बिकाऊ आहेत असे उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते म्हणत आहेत. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप हे फक्त गाढवच करु शकतो. मग अप्रामाणिक आमदार कोण आहेत?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. भाजपा याचे कधीच समर्थन करणार नाही. याविरुद्ध चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. पण हे जर खोटे असेल तर ते बोलणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असेही सोमय्या म्हणाले.