राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपाचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पावर आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यातील लढत प्रतिष्ठेची समजली जात होती. मात्र या लढतीमध्ये संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही आमदारांची नावे घेत त्यांनी आम्हाला मते दिली नाही, असा आरोप केला. राऊतांनी आमदारांची नावे जाहीर करण्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला असून राऊतांनी निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने याबद्दल योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> संभाजीराजेंच्या समर्थनार्थ शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत छत्रपती म्हणाले ‘माझ्या तत्त्वात…’

“शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला मतदान करणारे अपक्ष तसेच छोट्या पक्षांच्या ६ आमदारांची नावे उघड केली आहेत. ही कृती म्हणजे गोपनीयतेचा भंग नव्हे का? मी निवडणूक आयोगाला विनंती करतो निवडणूक आचारसंहितेचा भंग करण्याच्या या प्रकरणाची योग्य दखल घ्यावी,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा >>> “४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर”…. संजय राऊत यांचा टोला

संजय राऊत काय म्हणाले होते?

छोटे पक्ष तसेच अपक्षांनी भाजपाला साथ दिल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येत भाजपाला मतदान करणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची नावे घेत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. “बाजारातले काही घोडे विकले गेले. मला वाटतंय जास्त बोली लागली. किंवा इतर काही कारणं असतील. त्यामुळे आमची अपक्षांची ६ मतं आम्हाला मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात. पण आमचे घटक पक्ष, छोटे पक्ष यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावकर किंवा इतर अशी मतं आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची ६-७ मतं आम्हाला मिळवू शकलो नाही. आम्ही व्यापार न करताही संजय पवारांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली हाही आमचा विजयच आहे”, असं राऊत म्हणाले होते.

हेही वाचा >>> Rajya Sabha: भाजपा जिंकला, पण तो विजय खरा आहे काय?; सामना ‘रोखठोक’मधून संजय राऊतांची विचारणा

तसेच “ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीये कुणी आम्हाला मतं दिलेली नाहीत. ठीक आहे. पाहुयात”, अशा शब्दांत संजय राऊतांनी सूचक इशारा देखील दिला होता.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर आचासंहिता भंग केल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya demands action against sanjay raut over violation of election code of conduct prd