राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणावरुन शनिवारी दापोलीमध्ये दाखल झालेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्याबाहेर सोडलं. या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधात किरीट सोमय्यांचं कौतुक केलं आहे. किरीट सोमय्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात पत्रकारांनी कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटलांनी त्यांना पाठिंबा दर्श्वला.
दापोलीत नेमकं घडलं काय?
शनिवारी सकाळी सोमय्या दापोलीसाठी मुंबईमधून रवाना झाले. सायंकाळी ते दापोलीमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन केलं. रात्री सोमय्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी, “अनिल परब यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंना कारवाई करावी लागेल. आज आम्ही यासाठी निलेश राणे यांच्यासोबत सत्याग्रह केला आणि तो यशस्वी झाला. पोलिसांना आम्हाला अटक केली आहे आणि रत्नागिरीच्या बाहेर सोडणार आहेत. आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे,” असं म्हटलं होतं.
नक्की वाचा >> “मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान…”; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
त्याचप्रमाणे, “अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात ३ तारखेला केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मला विश्वास आहे की अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटणार आहे. त्यासाठी बेहिशेबी संपत्ती आणली आहे त्यावर ईडी आणि प्राप्तिकर विभागाची कारवाई होणार आहे,” अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली होती.
सोमय्या म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ
किरीट सोमय्या ड्रामा करताय असा आरोप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केलाय, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी, “कारण त्या सगळ्या मंत्र्यांना याची भीती आहे. हे बघा माणूस जेव्हा घाबरतो ना तेव्हा तो न घाबरल्याचा आव आणतो. घाबरला नाहीत तर आव कशाला आणतो. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा बांधून ठेवल्या आहेत. कोणाचा नंबर लागेल माहिती नाही. किरीट सोमय्या त्यांचा कर्दनाकाळ ठरलेला आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ आहे. किरीट सोमय्या आगे बढो हम तुम्हारे साथ है,” अशी प्रतिक्रिया दिली.